पुणे – सिंहगड रस्ता परिसरातील 12 दुकानांवर करोना सुरक्षेचे नियम न पाळल्याच्या कारणास्तव महापालिकेने कारवाई केली. गंगा भाग्योदय खाऊ गल्ली आणि माणिकबाग परिसरातील ही दुकाने असून, त्यांच्याकडून आठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरातील करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढलेल्या आदेशनुसार प्रतिबंधित क्षेत्रांबाहेरील जीवनावश्यक सेवा आणि त्या व्यतिरिक्त असलेली दुकाने, बाजारपेठा सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे.
दुकान आणि बाजारपेठांमध्ये येणाऱ्या नागरिकांनी फेसमास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाइझ करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचे पालन करत नसल्याचे निदर्शनाला आल्याने ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. या दुकानांवर उपअभियंता संभाजी खोत यांनी दंडात्मक कारवाई करून 8 हजार रुपये दंड वसूल केला.