पुणे – दिवसभराच्या ऊन-सावलीच्या खेळानंतर शुक्रवारी सायंकाळी पावसाने पुन्हा मुसळधार हजेरी लावली. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला. काही भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले. दरम्यान, सायंकाळपर्यंत शिवाजीनगर येथे 31 मिमी पावसाची नोंद झाली.
यासह गुरूवारी रात्री देखील शहराच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला. तर पुढील दोन दिवस कोकण-गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शुक्रवारी शहराच्या मध्य भागासह कात्रज, भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, पाषाण, सोमेश्वर वाडी, विश्रांतवाडी, बाणेर, बालेवाडी परिसरांत जोरदार पाऊस झाला. तर, सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुणे-2.7, लोहगाव येथे 1 मिमी, पाषाण येथे 13 मिमी पावसाची नोंद झाली. तर 1 जूनपासून पुणे-684.4 मिमी, लोहगाव-717.1 मिमी, पाषाण येथे 630.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सर्वच प्रमुख रस्ते जलमय
गुरुवारी रात्री शहराच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सरी बरसत होत्या. यावेळी शहरातील रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर शुक्रवारी दुपारपासून झालेल्या पावसामुळे अनेक भागांत घरात पाणी शिरले होते. यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. इतकेच नव्हे तर, झाडपडी आणि पाणी साचण्याच्या घटना घडल्या.