नायगाव -राज्यात कृषी विद्यापीठातंर्गत शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष शेतात शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करतात. करोनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या गावात हा उपक्रम राबविण्याची संधी मिळाली आहे. नायगाव येथील कृषिकन्या दिशा चौंडकर हिने गावशिवारातच महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाचे धडे दिले आहेत.
महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी, तळेगाव दाभाडे (ता. मावळ) महाविद्यालयाअंतर्गत कृषी कार्यानुभव कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दिशा हिने मकावर किटकांचा प्रादुर्भाव जादा आढळल्याचे निरीक्षण केले. त्यावर उपाय व शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून तिने मका पिकावर प्रात्यक्षिक करण्याचे ठरवले.
मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळत आहे. एकात्मिक पद्धतीने किडीचा प्रादुर्भाव कमी करू शकतो असे दिशा चौंडकर हिने सांगितले. यावेळी सीमा चौंडकर, रोहिणी चौंडकर उपस्थित होत्या.