मुंबई – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून दोन दिवस अरेतुरेची भाषा वापरल्यानंतर वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत हिने आज थेट कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून एक संदेश जारी करीत त्यांनाही या वादात ओढण्याचा प्रयत्न केला आहे.
आपला सहभाग असलेल्या सरकारकडून एका महिलेची छळवणूक सुरू असताना तुम्ही गप्प का, असा सवाल तिने सोनियांना केला असून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणीही तिने केली आहे.
तथापि सोनिया गांधी यांचा उल्लेख मात्र तिने आपल्या ट्विटर संदेशात आदराने केला आहे.
सन्मानीय कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी आपण स्वतः एक महिला असून तुमच्या महाराष्ट्र सरकारने माझ्यासारख्या एका महिलेला जी वागणूक दिली त्याबद्दल तुम्हाला संताप आला नाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा आदर राखून घटनेच्या तत्त्वांचे पालन करा, असा आदेश तुम्ही तुमच्या सरकारला देऊ शकत नाही का, असा सवालही तिने विचारला आहे.
सोनिया गांधी या पाश्चिमात्य देशात वाढल्या आहेत आणि त्या आता भारतात राहात आहेत. त्यांना महिलांच्या लढ्याची कल्पना असेलच अशी टिप्पणीही तिने केली आहे. तुमचे सरकार एका महिलेची छळवणूक करीत असताना आणि कायदा आणि सुव्यवस्थेची थट्टा सुरू असताना तुम्ही गप्प राहिलात या तुमच्या गप्प राहण्याची इतिहास नोंद घेईल, असेही तिने म्हटले आहे.
कंगना राणावत हिने तिच्या बंगल्यात बेकायदा बांधकामे करून चौदा प्रकारे महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिच्या बंगल्याचे काही बेकायदा बांधकाम पाडले आहे. त्यावरून ती सध्या अत्यंत संतप्त झाली आहे. त्यातूनच ती विविध प्रकारचे संदेश ट्विटरवरून देत आहे.