मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाला अंमलीपदार्थांचीही किनार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी आता अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी रियाचा भाऊ शौविक व सुशांतच्या घरी काम करणारे दोन कर्मचारी यांनाही एनसीबीने ताब्यात घेतलं होत.
अटक करण्यात आल्यानंतर रियाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आजच न्यायालयासमोर सादर केलं जाणार आहे. असं असलं तरी एनसीबीकडून रिया चक्रवर्ती हिच्या कस्टडीची मागणी केली जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रियाचे वकील तिला जमानत मिळावी यासाठी तातडीने अर्ज करतील अशीही माहिती मिळत आहे.
दरम्यान, एनसीबीने रियाची तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर तिला आज अटक करण्यात आली आहे. एनसीबीला आवश्यक असलेली सर्व माहिती व पुरावे मिळाले असल्याने एनसीबीकडून रियाच्या कस्टडीची मागणी केली जाणार नसल्याचे समजते. यामुळे रियाबाबतचा पुढील निर्णय न्यालयामध्ये होणार आहे.
सुशांत मृत्यू प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत १० जणांना अटक केली असून यामध्ये करण अरोरा, के अब्बास, जैद, बासित परिहार, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, कैझान इब्राहिम, दीपेश सावंत, अनुज आणि रिया चक्रवर्ती यांचा समावेश आहे.
रिया चक्रवर्ती विरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 (सी), 20 (बी) (आयआय), 27 (अ), 28 आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त इंडिटिव्ही इंडिया या वृत्तसंकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.