भोर (पुणे) – भाटघर धरण क्षेत्रातील (ता. भोर) दुर्गम भागात तरंगत्या दवाखान्याद्वारे नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात झाली असून, या आरोग्य सेवेचे परिसरातून स्वागत केले जाते आहे.
राज्य सरकारच्या वतीने भोर तालुक्यातील भाटघर धरण क्षेत्रातील अतिदुर्गम गावांमध्ये लॉंचद्वारे आरोग्यसेवा पुरवली जाते. शनिवारी (दि. 5) पासून या सेवेला सुरुवात झाली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन मालाजुरे यांनी सांगितले असून, एकाचवेळी सुमारे 100 नागरिकांना या सेवेद्वारे उपचार मिळणार आहेत.
सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर ही आरोग्यसेवा या वर्षी उशिरा सुरू झाली आहे, अन्यथा दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातच हे काम सुरू होते. आठवड्यात बुधवारी आणि शनिवारी अशा दोन दिवशी या सेवेचा लाभ येथील नागरिकांना घेता येणार आहे.
भाटघर धरण क्षेत्राचा परिसर हा भोर तालुक्यातील अतिदुर्गम परिसर असून, येथील नागरिकांना उपचारासाठी बाहेरगावी किंवा मोठ्या शहरांमध्ये जाणे शक्य होत नाही, त्यामुळेच येथे दरवर्षी ही सेवा लॉंचद्वारे उपलब्ध करून दिली याते. या लॉंचमधील वैद्यकीय पथकामध्ये लॉंच ऑपरेटर राजेंद्र कंक यांच्यासह डॉक्टर आणि नर्स उपस्थित आहेत. मात्र, कंपाऊंडरची जागा रिक्त असल्याने औषधे देण्याचे काम स्वतः डॉक्टरांनाच करावे लागत आहे.
या गावांसाठी उपलब्ध आहे वैद्यकीय सेवा
चांदावणे, गुहिणी, खुलशी, भूतोंडे, डेरे, भाड्रवली, मळे-सुतारवाडी, बुरूडमळा, सांगवी वेखो, वाघमाची, गोपे, घुमटवस्ती आणि कुंबळे.