पुण्यातील रस्ते अपघातांत 21.8 टक्क्यांनी कमी
2018च्या तुलनेत 19 मध्ये घट
पुणे – वाहनचालकांचा निष्काळजीपणा, नियमांचे उल्लंघन आदींमुळे दरवर्षी देशात लाखो अपघात घडतात. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांचा आलेख उंचावत होता. मात्र, 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये देशात वाहतूक अपघातांचे प्रमाण घटले आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात दुचाकींमुळे झालेल्या अपघातांत सर्वाधिक मृत्युची नोंद झाली. तर पुण्यातील रस्ते अपघातांमध्ये 21.8 टक्क्यांनी घट झाल्याची नोंद अहवालात केली आहे.
वाहतूक अपघातांमध्ये रस्ते अपघात, रेल्वे अपघात आणि रेल्वे क्रॉसिंग अपघातांचा समावेश असून, 2019 अपघातांबाबतचा “नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. 2018 च्या तुलनेत वाहतूक अपघातांमध्ये काही अंशी घट झाल्याचे यात नोंदवले आहे. देशात 2018 मध्ये 4 लाख 74 हजार 638 अपघात झाले. तर, 2019 मध्ये 4 लाख 67 हजार 171 झाले होते.
या अहवालानुसार, देशात 2018 मध्ये 4 लाख 45 हजार 514 रस्ते अपघात झाले. तर 2019 मध्ये 4 लाख 37 हजार 396 अपघातांची नोंद आहे. राज्यात 2018 मध्ये 29 हजार 740 रस्ते अपघात आणि 2019 मध्ये 27 हजार 286 अपघातांची नोंद झाली असून, यामध्ये 8.3 टक्क्यांची घट झाली. तर पुण्यात 2018 मध्ये 394, तर 2019 मध्ये 308 अपघात घडले. यामध्ये 21.8 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली.
पुण्यातील अपघातात 227 मृत्यू, सर्वाधिक अपघात अतिवेगामुळे
2019 मध्ये पुण्यात झालेल्या 308 अपघातांपैकी तब्बल 227 जणांचा मृत्यू झाला. तर 94 जण जखमी झाले. याचबरोबर पुण्यात दुचाकींच्या अपघातांमुळे सर्वाधिक म्हणजेच 89 जणांचा मृत्यू झाला. एकूण अपघातांपैकी तब्बल 157 अपघात अतिवेगामुळे झाले. तर निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे 141 अपघातांची नोंद झाली.