बेल्हे – बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) गावात सोमवारी (दि. ७) रात्री साडेनऊ वाजता पाऊस सुरू असताना अचानक घराची भिंत अंगावर पडल्याने दादाभाऊ किसन बोरगे (वय- ७६) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी लिलाबाई बोरगे या किरकोळ जखमी झाल्या.
घरात पत्नी व ते स्वतः असे दोघेच राहत होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर आणि त्यांच्या सहाका-यांनी घटनास्थळी भेट दिली येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी दादाभाऊ बोरगे व त्यांच्या पत्नीला बाहेर काढले परंतु तोपर्यंत दादाभाऊ बोरगे यांचा मृत्यू झाला होता.
ग्रामपंचायत मिळकत नंबर ४३७ मध्ये पडलेले घर हे घरकुल विस्तार योजनेतून त्यांना मिळाले होते. सदर कच्चे घर २०x१२ या मापाचे दगड-विटा कौलारू पद्धतीने बांधकाम केले होेते. यामध्ये एकूण घराचे दीड लाख रुपये चे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री बोरी येथे १२ मि. मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मंडळ अधिकारी नितीन चौरे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.