करोनामुळे उद्भवलेल्या संकटकाळात जसे विविध उद्योगधंदे बंद पडले आहेत, तसेच मनोरंजन क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. नाट्यगृह, सिनेमागृह बंद आहेत. त्यामुळे आपले चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांना खूप अडचणी येत आहेत. मात्र, ओटीटी अर्थात ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्यामुळे अनेक मोठे चित्रपट या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत.
विशेष म्हणजे प्रेक्षकांनीही हे नवे मध्यम स्वीकारले असल्यामुळे भविष्यातही ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मचा बाजार तेजीत राहणार, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. भारतात 2019 मध्ये ओटीटी वापरणाऱ्यांची संख्या 150 मिलियन म्हणजे 15 कोटी इतकी होती. ती दुप्पट होऊ शकते. काय आहे ओटीटी प्लॅटफॉर्म, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
ओटीटी एक असे मध्यम आहे जे पारंपरिक केबल किंवा ब्रॉडकास्ट ऐवजी फक्त इंटरनेटव्द्वारे व्हिडीओ किंवा अन्य मीडियाशी संबंधित कंटेंट प्रदर्शित करते. थोडक्यात, हे एखाद्या ऍपच असते, ज्यावर तुम्ही चित्रपट तसेच मालिका पाहू शकता. मात्र यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. यानंतर, तुम्हाला हवे असेल ते कंटेंट तुम्ही पाहू शकता.
सध्या नेटफ्लिक्स, अमेझॉन परीने व्हिडीओ, हॉट स्टार, आल्ट बालाजी, झी5, वूट, सोनी लिव्ह असे उत्तम दर्जाचे ओटीटी प्रोव्हायडर आहेत. याशिवाय कमीतकमी 300 ओटीटी प्रोव्हायडर आहेत, जे ही सर्व्हिस देतात. तुम्ही तुमचं आवडतं ओटीटी प्लॅटफॉर्म ऍप डाऊनलोड करून त्याचं सबस्क्रिप्शन घेऊन आपलं आवडतं कंटेंट एन्जॉय करू शकता.