पुणे : बलात्कार, विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस जामीन व्हावा असा अहवाल पोलिसांनी द्यावा, अशी मागणी करीत आरोपीच्या पत्नीने पोलीस ठाण्यात डिझेल अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
येरवडा पोलीस ठाणे परिसरात बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी महिलेस आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं आणि तिला नोटीस बजावली आहे.
पोलीस शिपाई प्रमिला पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नगर रोड येथे राहणाऱ्या एका 29 वर्षीय महिलेविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलीस ठाण्यात बलात्कार, विनयभंग प्रकरणी 2009 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका आरोपीच्या जमीनाबाबत न्यायालयात सुनावणी तारीख आहे.
सदर आरोपीस जामीन व्हावा असा अहवाल पोलिसांनी द्यावा यासाठी आरोपीची पत्नी बुधवारी पोलीस ठाण्यात आली होती. तिने सोबत लपवून आणलेल्या बाटलीत डिझेल आणले होते . सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ती बाटलीतील डिझेल अंगावर ओतून घेत पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागली हा प्रकार घडताच पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. उपस्थित महिला कर्मचाऱ्याने तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं.