…म्हणून शरद पवारांनी नातू पार्थ यांना फटकारले असेल – संजय राऊत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पार्थ पवार यांना फटकारताना, ‘आपला नातू अप्रगल्भ असून त्याच्या बोलण्याला महत्व देत नाही.’ असं वक्तव्य केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दरम्यान, आज याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, राजकीय विधान केल्यानेच शरद पवार यांनी राजकीय उत्तर दिलं असेल असं सांगितलं आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत केली होती. याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी पार्थ यांना चांगलंच फटकारलं. अशातच आज याबाबत शिवसेनेची प्रतिक्रिया काय? असं विचारलं असता संजय राऊत यांनी, ““पार्थ पवार हे पक्षाचे प्रवक्ते नाहीत, प्रमुख नेते नाहीत. त्यांचे वडील अजित पवार प्रमुख नेते आहेत. अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील काही बोलत आहेत का ? मग तुम्ही कुटुंबात कलह का निर्माण करत आहात?” असा प्रतिप्रश्न उपस्थित केला.

“शरद पवारांनी एखादी भूमिका घेतली असेल किंवा एखादं वक्तव्य केलं असेल तर त्याच्यावरती मीडियानं फार चिंता करण्याचं कारण नाही. जे पवारांना ओळखतात त्यांनी शरद पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं हे समजून घेतलं पाहिजे. शरद पवारांना जे काही बोलायचं होतं ते ते बोलले आहेत,” असंही संजय राऊत म्हणाले.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूच्या चौकशीबाबत बोलताना शरद पवार यांनी काल, मुंबई पोलिसांवर विश्वास असल्याचे सांगताना सीबीआय चौकशीची मागणी असेल तर त्याला विरोध नसल्याचं म्हंटल होत. याबाबत राऊत यांना विचारले असता त्यांनी, “त्यांनी मुंबई पोलीस योग्य दिशेने तपास करत असून क्षमेतवर २०० टक्के विश्वास असल्याचं सांगितलं आहे. गृहमंत्र्यांनीही तेच म्हटलं असून आम्हीही तेच सांगत आहोत. तपास व्यवस्थित सुरु असताना सीबीआयकडे तपास देण्यास आमचा विरोध आहे. इथे लपवायला काहीच नाही. मुंबई पोलिसांच्या तपासाव्यतिरिक्त अजून काही सीबीआयला सापडणार नाही. त्यांनी सीबीआयला आमंत्रण दिलेलं नाही.” अशी भूमिका मांडली.

सुशांत सिंह राजाजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेतले जात असल्यासंबंधी विचारलं असता राऊत यांनी, “मोठ्या लोकांची किंवा त्यांच्या कुटुंबाची नावं घेतल्याशिवाय प्रकरणाला सनसनाटी निर्माण होत नाही असं एक सूत्र झालं आहे. आदित्य ठाकरेंचं नाव कोणीही कुठेही घेतलेलं नाही. पोलीस जो तपास करत आहेत त्यांना शांतपणे तपास करु देणं हे त्या प्रकरणाच्या आणि सुशांतला न्याय मिळण्याच्या दृष्टीने सोयीचं आहे. न्याय हवा असेल तर सुशांतच्या कुटुंबीयांनी काही काळ शांत राहावं आणि मुंबई पोलिसांच्या तपासात सहकार्य करावं” असं सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.