शिमला – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्या मनाली स्थित घराबाहेर शुक्रवारी अज्ञाताकडून गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी दिली.
कंगना म्हणाली, मी रात्री माझ्या खोलीत झोपले होते. त्यावेळी शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान मला फटाक्यांसारखा आवाज आला. पहिल्यांदा मी आवाजाकडे दुर्लक्ष केले, पण तसाच आवाज पुन्हा एकदा आला. मात्र यावेळी तो आवाज फटाक्यांसारखा नव्हता तर बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखा होता. त्यानंतर मी वॉचमनला बोलावले. त्याने देखील आवाज ऐकला पण तो आवाज नेमका कसला होता हे त्याला सांगता आले नाही. मग मी शेवटी पोलिसांकडे तक्रार केली.
सध्या मी राजकिय, सामाजिक आणि बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य करत आहे. त्यामुळे माझं मत न पटणाऱ्यांनी मला घाबरवण्यासाठी हा गोळीबार केला असावा, असे मला वाटते, असे तिने सांगितले.