मंचर – थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील ग्रामसेवकास शिवीगाळ, मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख नितीन मिंडे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 13) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामसेवक नवनाथ गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
याबबतची माहिती अशी की, सोमवारी (दि. 13) नितीन मिंडे म्हणाले की, तुम्ही तोंडावर मास्क परिधान न करणाऱ्यांवर, तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ज्यांच्या आदेशाने करता, तो आदेश मला दाखवा. असे म्हणून त्यांनी ग्रामसेवक गायकवाड यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी तेथे उपस्थित असलेले पोलीस जवान ईश्वर कदम यांनी मिंडे यांना शिवीगाळ न करण्यास आणि जी तक्रार असेल ती पोलीस ठाण्यात द्या, असे सांगितले.
त्यावेळी मिंडे यांनी कदम यांनाही मध्ये न बोलण्यावरून सुनवले. तर मिंडे यांना सरकारी कामात अडथळा न आणण्याबाबत सांगण्यात आले तेव्हा त्यांनी शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ आणि मारहाण करीत सीओंना फोन करून नोकरीच घालवण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर खबाले करत आहेत.
दंडाची पावती फाडलीच नाही
पोलीस जवान ईश्वर कदम, ग्रामपंचायतीचे कर्मचारी असे सर्वजण विनामास्क असणाऱ्यांवर कारवाई करीत होतो, त्यावेळी कदम यांनी पाणी पिण्यासाठी मास्क काढला होता. त्यावेळी तुम्ही मास्कविना फिरता यावरुन मिंडे यांनी वाद घातला होता. कदम यांनी फक्त पाण्यासाठी मास्क काढला होता, त्यामुळे दंडाची कोणतीही पावती फाडलेली नाही, असे ग्रामसेवक नवनाथ गायकवाड यांनी सांगितले.