वॉशिंग्टन: अमेरिकेने चीनचा दक्षिण चीन सागरी हद्दीवरील दावा फेटाळून लावला आहे. चीनने तेथे बळजबरीने आपले नियंत्रण केले असून तसा त्यांना काहीच अधिकार नाही त्यांची ही कृती बेकायदेशीर असल्याचे ट्रम्प प्रशासनाने आज घोषित केले आहे. ट्रम्प प्रशासनाचा हा एक मोठा निर्णय मानला जात असून त्यातून अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष अधिकच भडकण्याची चिन्हे आहेत.
दक्षिण सागरी हद्दीत आपलेच साम्राज्य आहे असा दावा आता चीनला करता येणार नाही. या संबंधात दक्षिण पुर्व अशियातील देशांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू असे अमेरिकेने म्हटले आहे. या देशांच्या सागरी हद्दींचे संरक्षण करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू अशी भूमिकाही अमेरिकेने घेतली असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे महत्व दिले जात आहे.
अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पओ यांनी ही धोरण विषयक घोषणा केली. दक्षिण चीन समुद्राच्या कडेला असलेल्या सर्व देशांच्या सागरी हद्दींचे आणि अधिकारांचे रक्षण केले पाहिजे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला आम्ही समर्थन देत राहू असे अमेरिकेने म्हटले आहे. चीन बेकायदेशीर पणे त्या सागरी हद्दीवर आपले नियंत्रण सांगू शकत नाही असेही पॉम्पेओ यांनी म्हटले आहे.
फिलीपाईन्सच्या भूप्रदेशापासून 12 सागरी मैलाच्याही पुढे आमची सागरी हद्द असल्याची चीनची भूमिका अमान्य करण्यात येत आहे असेही त्यांनी घोषित केले आहे. संपुर्ण दक्षिण सागरी हद्दीवर नियंत्रण मिळवण्याचा चीनचा डाव हाणून पाडला जाईल असेही पॉम्पओ यांनी म्हटले आहे.