पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला राज्यातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या (फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र) “फाम’ने विरोध दर्शविला आहे. लॉकडाऊनचा पुनर्विचार करावा, अशी मागणी “फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी केली आहे.
मार्केटयार्डातील गुळ-भुसार बाजार नागरिकांनी शनिवारी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी केली होती. यापूर्वी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अन्नधान्याची मुख्य बाजारपेठ सुरु होती. व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन सर्व व्यवहार सुरळीत पार पाडले. 13 ते 23 जुलै या कालावधीत शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर नागरिक भीतीपोटी खरेदीसाठी गर्दी करत असल्याने सामाजिक अंतर पाळण्याचा नियमाला हरताळ फासण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
दहा दिवस भुसार बाजार बंद ठेवण्यात आल्याने कोरोना नियंत्रणात येईल, अशी शक्यता नाही. त्यामुळे भुसार बाजारातील व्यवहार सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, असे शहा यांनी म्हटले आहे. दरम्यान, पुणे शहर व्यापारी महासंघाने शहरात पुन्हा लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला यापूर्वीच विरोध केला आहे.