पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता (काका) साने (वय 48) यांचे करोनामुळे शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादीची मुलुखमैदानी तोफ थंडावली असून संपूर्ण शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दत्ता साने यांनी लॉकडाऊन दरम्यान मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना मदत केली होती. या कालावधीत त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यांना थोडा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी स्वत:हून 22 जून रोजी आपली करोना चाचणी करण्यासाठी घशातील स्वॅब दिले होते. 24 जून रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती. श्वसनाचा त्रास, उच्च रक्तदाब, मधुमेह व न्यूमोनियामुळे त्यांची प्रकृती खालवली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे पावणे सहाच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तत्पूर्वी त्यांच्यावर प्लाझ्मा थेअरीही वापरण्यात आली होती, असे बिर्ला रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
दत्ता साने हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर चिखली परिसरातून सलग तीनवेळा निवडून आले होते. महापालिका सभागृहात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा आणि तडीस नेणारा नेता अशी त्यांची ओळख होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शहरातील सर्वाधिक आक्रमक आणि लढवय्या चेहरा म्हणून त्यांनी आपली पक्षांतर्गत व शहरपातळीवर छबी निर्माण करण्यात यश मिळविले होते. सत्तारुढ भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेली तीन वर्षे ते सातत्याने सभागृहात आवाज उठवित होते. तर विरोधी पक्षनेता म्हणून राष्ट्रवादीकडून जबाबदारी पार पाडताना त्यांनी सर्वाधिक यशस्वी विरोधी पक्षनेता असा नावलौकिक मिळविला होता. त्यांच्या जाण्यामुळे सर्वसामान्य शहरवासियांसोबतच राष्ट्रवादीचेही कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
दत्ता साने यांच्या निधनाने सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारा झुंजार कार्यकर्ता, चांगला सहकारी आपण गमावला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहात आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांचे कार्य हे नेहमीच पक्षसंघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरेल, दत्ताकाका साने यांच्या जाण्याने राष्ट्रवादीने एक उमदा कार्यकर्ता गमाविला असून पक्षाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री
दत्ताकाका साने यांच्या निधनाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचा शिलेदार गमावला आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे. नगरसेवक दत्ताकाका साने यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांसाठी केलेले काम नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहिल. सामान्य जनतेचे प्रश्न तळमळीने सोडविणारा एक सच्चा कार्यकर्ता आपल्यातून गेला आहे. त्यांचा परिवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
– जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा गटनेते
दत्ताकाका यांच्याकडून मी समाजकार्याचे धडे घेतले. समाजकारण काय असते, नागरिकांशी संपर्क कसा वाढवावा, याविषयी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीमुळे चिखली गावाचे नाव शहराच्या सामाजिक व राजकीय पटलावर अधोरेखीत झाले. त्यांचे कार्य आम्हाला कायम मार्गदर्शन ठरणार आहे.
– पांडुरंग साने, भाजपा युवा नेते
समाजकारण, राजकारणात मोठी उंची गाठूनही दत्ताकाकांना त्याचा अजिबात गर्व नव्हता. थोरा-मोठ्यांशी आपुलकीने व मिळून-मिसळून वागत असल्याने त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात आदर होता. त्यांच्या अकाली निधनाने शहराला मोठा धक्का बसला आहे. भविष्यात त्यांची उणीव शहराला कायम भासणार आहे.
– अविनाश मोरे, उद्योजक
दत्ता काकांच्या कुटुंबियांशी अनेक वर्षांपासून सलोख्याचे संबंध आहेत. सामाजिक कार्यात कार्यरत असल्याने दत्ता साने यांच्याशी सूर जुळले होते. जनसामान्यांसाठी लढणारे ते लोकाभिमुख नेते होते. उद्योजकांचा शास्तीकर माफ करण्यासाठी काढलेल्या मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले होते. आता हा लढा निर्णायक वळणावर असताना दत्ताकाकांच्या अकाली निधनाने आमचा संघर्ष आता पोरका झाला आहे. या संघर्षात त्यांची उणीव आम्हाला कायम भासणार आहे.
संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना
मान्यवरांची श्रद्धांजली
दत्ताकाका हे माझे अतिशय जवळचे मित्र होते. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी मोठी तळमळ होती. नेहमी सर्वांसाठी झटणारे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. महापालिका सभागृहात ते पोटतिडकीने प्रश्न मांडत असत. त्यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी हानी झाली आहे.
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर लोकसभा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ढाण्या वाघ, सर्वसामान्यांचा आधारस्तंभ आपल्यातून अचानक निघून गेला. दत्ताकाकांच्या जाण्यामुळे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. माझ्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का असून, बोलण्यासाठी शब्दच नाहीत. सर्वसामान्यांसाठी नेहमीच झगडत त्यांच्या प्रश्नासाठी महापालिका सभागृहात आवाज उठविणारा हक्काचा माणूस अशी दत्ताकाकांची ख्याती होती. त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आमचा लढवय्या सहकारी हरपला.
– संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
अत्यंत मनमिळवू आणि तितकेच कठोर असलेल्या दत्ता काकांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठविला. आमच्या विरोधी पक्षात असले तरी दत्ताकाका आपला मुद्दा पटवून देऊन तो प्रश्न सोडवून घेत असत. प्रभागातील समस्या सोडविण्याबरोबरच नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी ते तत्पर असत. त्यांच्या जाण्यामुळे सभागृहातील वाघच गेला.
– उषा उर्फ माई ढोरे, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका
दत्ता साने आणि मी पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात सोबत काम केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असताना, त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आमचे फोनवर तीनवेळा बोलणेदखील झाले होते. मात्र, ते अचानकपणे आपल्याला सोडून जातील, असे वाटले नव्हते. त्यांच्या निधनाने शहराने एक चांगला नेता, तर मी व्यक्तीश: एक चांगला मित्र गमावला आहे.
– श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा
सर्वपक्षीयांसोबत मैत्री असणारा हा दिलदार मित्र आज अचानक सर्वांना सोडून निघून गेला. दत्ताकाका हे सर्वार्थाने राजकीय नेते असले तरी नागरिकांना मदत करणारा, मदतीसाठी कधीही धावून जाणारा वक्ता, प्रवाहाविरोधात पोहणारा, चुकीचे असेल तिथे प्रसंगी पक्षाविरोधात जाऊन बोलणारा अशी त्यांची चतुरस्त्र ओळख होती. असा हा बहुमूल्य मित्र मी गमाविला.
– लक्ष्मण जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा
दत्ता साने कधी नेता म्हणून नव्हे; तर नेहमी कार्यकर्ता म्हणून वावरले. शहरातील सर्वसामान्यांची बाजू घेताना प्रसंगी ते पक्षाचे धोरण देखील बाजूला ठेवत. स्पष्टवक्ता, सर्वांमध्ये मिळून-मिसळून वागणारा आमचा लढवय्या मित्र मी गमावला आहे.
राहुल कलाटे, शिवसेना गटनेते
सभागृहातील एक स्पष्टवक्ता अशी दत्ताकाका साने यांची ओळख होती. अभ्यासपूर्ण शैलीत ते विषय मांडायचे. सभागृहात ते सत्ताधाऱ्यांवर टीका करत असले, तरीदेखील सभागृहाबाहेर ते आमचे चांगले मित्र होते. त्यांच्या निधनाने महापालिकेने एक अभ्यासू व स्पष्टवक्ता नेता गमावला आहे.
– नामदेव ढाके, सत्तारूढ पक्षनेते
पिंपरी-चिंचवड शहरातील एक परखड नेतृत्व व उत्तम वक्ता असलेल्या दत्ताकाका साने यांनी महापालिका सभागृहात कायम जनसामान्यांची बाजू मांडली. विरोधी पक्षनेता कसा असावा, हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले.सभागृहातील आक्रमकपणामुळे सत्ताधारी पक्षावर त्यांचा अंकुश राहिला. त्यांची अकाली “एक्झिट’ मनाला चटका लावणारी ठरली आहे, असे नेतृत्व शहरात पुन्हा होणे नाही.
– अनिल जाधव, प्रदेश महासचिव, वंचित बहुजन आघाडी
सामाजिक चळवळीतील दत्ताकाका यांच्या अचानक जाण्याने आमच्यासह शहराला मोठा धक्का बसला आहे. सामाजिक चळवळीची मोठी हानी, तर झाली आहेच; मात्र मी एक सच्चा मित्रदेखील गमावला आहे.
– यशवंत भोसले, अध्यक्ष, रा. श्रमिक आघाडी
लॉकडाउनच्या काळात सर्वसामाणन्यांची उपासमार होऊ नये, याकरिता दत्ता साने यांनी धान्य व आवश्यक वस्तूंचे किटवाटप केले. यामुळे हजारो जणांना आधार मिळाला. त्यामुळे अनेकांचे स्थलांतर थांबले. यानिमित्ताने त्यांच्या दातृत्वाचा आणखी एक पैलू जगासमोर आला. त्यांच्या अकाली निधनाने लाखोंचा पोशिंदा गेला आहे. त्यांच्या कार्याला सलाम.
समीर मुल्ला, रिलिफ सोशल फाऊंडेशन
शहरातील अनधिकृत बांधकाम, शास्तीकर व रिंगरोड बाधितांच्या बैठकांचे नेतृत्व दत्ता साने यांनी केले होते. विशेषत: ते महापालिकेचे विरोधी पक्षनेते असताना या लढ्याला दिलेले योगदान महत्वाचे ठरले. घर बचाव संघर्ष समितीला त्यांनी पाठबळ दिले होते. त्यांच्या या भूमिकेचा घर बचाव संघर्ष समितीला मोठा आधार होता. त्यांच्या जाण्याने आमचा आधारवड हरपला आहे.
विजय पाटील मुख्य समन्वयक, घर बचाव संघर्ष समिती