पिंपरी (प्रतिनिधी) – लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देणे शक्य नाही. त्यामुळे त्यावर उपाय शोधत इन्व्हॉयर्नमेंट कन्झर्वेशन असोसिएशनने (ईसीए) गणेशमूर्ती बनविण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचे नियोजन केले आहे. गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठाच्या सहाय्याने गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण व्हिडिओद्वारे दिले जाणार आहे. मूर्ती बनवून झाल्यावर ते पीठ पुन्हा वापरता येणार आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी “ईसीए’च्या वतीने दरवर्षी शहरातील शाळांमध्ये शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. तसेच, “करोना’चा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांना एकत्र जमवून शाडू मातीमध्ये मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देता येणार नाही. त्यावर उपाय म्हणून गणेशमूर्ती बनविण्याचा व्हिडिओ तयार केला आहे. फेसबुकवर हा व्हिडिओ टाकलेला असून त्याच्या लिंकद्वारे गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शहरातील 600 शाळा “इसीए’च्या संपर्कात आहेत. संबंधितांच्या ई-मेलवर तसेच शिक्षकांना हिीीं://ुुु.षरलशलेज्ञ.लो/100000156000906/िीीं/3777185918963238/ ही लिंक शेअर केली जाणार आहे. त्याशिवाय, 34 व्हॉट्सऍप ग्रुपद्वारे देखील संबंधित लिंक शेअर करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
ऑनलाइन शिक्षणाच्या वेळी प्रशिक्षण शक्य
शहरातील शाळांमध्ये 15 जूनपासून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण संबंधित ऑनलाइन शिक्षणासोबत देणे शक्य आहे. गणेशमूर्तीचा आकार आणि रचना शिकविण्यासाठी घरातील गव्हाचे, ज्वारीचे पीठ घेऊन त्यापासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मूर्ती बनवून झाल्यावर ते पीठ पुन्हा वापरता येईल. व्हिडिओ पाहून मुलांना मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घरबसल्या घेता येईल, अशी माहिती विकास पाटील यांनी दिली.