गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाव्दारे केली मागणी
कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापुरात पोलिस आयुक्तालयाची स्थापना करा, तसेच पोलिसांसाठी सर्वसुविधांयुक्त निवासस्थानांची बांधणी करावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.
या संदर्भातील निवेदन देशमुख यांना देऊन सविस्तर चर्चा केली. कोल्हापूर जिल्ह्याची वाढती लोकसंख्या, त्या अनुषंगाने वाढती गुन्हेगारी याचा विचार करून कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय सुरू करण्यात यावे, ही कोल्हापूरवासीयांची २० ते २५ वर्षांपासून मागणी प्रलंबित आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या जनगनेनुसार ३८ लाखांहून अधिक असून त्या तुलनेत गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे.
कोल्हापूर येथे पोलिस आयुक्तालय झाल्यास पोलिस आयुक्त एक, पोलिस उपायुक्त दोन, सहायक पोलिस आयुक्त दहा, पोलिस निरीक्षक ४८, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक १४५, पोलिस कर्मचारी तीन हजारहून अधिक असा कर्मचारी वर्ग उपलब्ध होणार आहे. हे विभाग शहर व ग्रामीणमध्ये पोलिस मुख्यालय, कोल्हापूर ग्रामीण व शहर, शस्त्र विभाग, परेड मैदान, मोटार परिवहन विभाग यामध्ये विभागले जाणार असून यामुळे वाढत्या गुन्हेगारीस आळा बसण्यास मदत होईल.
प्रस्तावित कोल्हापूर पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी पोलिस विभागाच्या मालकीच्या सर्व्हे क्र. ९५३/१ अ येथील १.७८ हेक्टर जागा उपलब्ध आहे. याला अनुसरून कोल्हापुरात पोलिस आयुक्तालयाची स्थापना करणेबाबत त्वरित कार्यवाही करावी. याचबरोबर कोल्हापुरातील पोलिस निवासस्थानांची समस्या गंभीर आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या तुलनेत निवासस्थानांची संख्या खूपच कमी आहे. यामुळे पोलिसांसाठी सर्वसुविधांयुक्त निवासस्थानांची बांधणी करावी.
दरम्यान, या दोन्ही प्रश्नावर जिल्हयाचे पालकमंत्री सतेज पाटील शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत, याचबरोबर गृहमंत्री देशमुख यांनीही दखल घेतल्यास कोल्हापुरात पोलिस आयुक्तालयाची स्थापना करणे व पोलिसांसाठी निवासस्थानांची उभारणी करणेबाबतचे निर्णय लवकर होतील, असा विश्वास आमदार जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील आदी उपस्थित होते.