नगर – तालुक्यातील निमगाव वाघा येथील किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने शुक्रवार (दि.26)राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे यांनी केले आहे.
ही स्पर्धा निशुल्क असून, इयत्ता पाचवी ते दहावी (लहान गट), व अकरावी ते महाविद्यालयीन (मोठा गट) या दोन गटात होणार आहे. या स्पर्धेसाठी करोना योध्दे हेच खरे हिरो, करोना संक्रमणापासून बचावाच्या उपाययोजना, अंमली पदार्थ मानवी जीवनाला लागलेली कीड, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम हे दोन्ही गटासाठी विषय देण्यात आले आहेत. ही चित्रकला स्पर्धा 26 जून रोजी सकाळी 11 ते 1 वाजे पर्यंत ऑनलाइन पध्दतीने घेतली जाणार आहे.