जमैका – जगभरात सुरू झालेल्या वर्णद्वेषाविरुद्धच्या आंदोलनात उडी घेताना वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याने ही मानसिकता दूर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सर्वसामान्य जीवन असो किंवा क्रीडाक्षेत्र जिथे काही व्यक्त एकत्र येतात तिथे एकमेकांप्रती आदर राहावा. कोणत्याही व्यक्तीने अन्य व्यक्तीचा वर्ण, जात किंवा धर्म यांत फरक करू नये. आज जगात अनेक जाती-धर्माचे लोक एकत्र येतात, त्यांच्यात ईर्ष्या असण्यापेक्षा मैत्री व्हावी. वर्णद्वेषाची ही कीड समाजातून लवकरात लवकर नाहीशी व्हावी तरच आपण एक समाज म्हणून एकत्र येऊ शकतो. वर्णद्वेषाचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर आधी मानसिकता बदलली गेली पाहिजे, असेही ब्राव्हो याने व्यक्त केले आहे.
कोणी गौरवर्णी आहे किंवा कृष्णवर्णीय आहे असे समजण्यापेक्षा आपण माणूस म्हणून एकमेकांशी का आदराने वागत नाही. अमेरिकेत जे घडले ते वाईटच होते. मात्र, हे का घडले व आणखी किती काळ आपण एकमेकांमध्ये फरक करणार. गुणवत्ता, स्वभाव, वर्तन याबाबत आग्रही असले पाहिजे. केवळ कोणी काळा रंगाचा आहे म्हणून कोणाला हिणवले जाऊ नये. आपल्याला तेव्हाच आदर मिळतो जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचा आदर करतो. जागतिक क्रिकेटमध्येही या घटना घडलेल्या आहेत. दक्षिण आफ्रिका संघावर याच कारणाने बंदी घातली गेली होती. घटना घडल्यावर कारवाई करण्यापेक्षा मानसिकता बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षाही ब्राव्होने व्यक्त केली.