अबू धाबी – क्रिकेट जगतात 15 वर्षांपूर्वी टी-20मुळे जे क्रांतीकारी बदल घडून आले होते. त्याच प्रमाणे पुढील काळात टी-10 क्रिकेटमुळे बदल दिसून येतील, असा विश्वास वेस्ट इंडीजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो याने व्यक्त केला आहे. तसेच टी-10 क्रिकेट खेळण्यासाठी तयार असल्याचेही त्याने सांगितले.
अबुधाबी येथे होणाऱ्या आगामी टी-10 स्पर्धेत ब्राव्हो सहभागी होणार आहे. या खेळाच्या नवीनतम अवतारांबद्दल ब्राव्हो म्हणाला, टी-10 ही एक रोमांचक स्पर्धा आहे. काही वर्षांपूर्वी टी-20 स्पर्धेमुळे क्रिकेट विश्वात क्रांतीकारक बदल घडून आला. हा क्रीडा प्रकार खूपच लोकप्रिय ठरला आणि जगभरातील अनेक प्रेक्षकांनाही तो आवडला आहे.
मला वाटते टी-10 नक्कीच असे काहीतरी करू शकेल. माझा विश्वास आहे की यामुळे खेळाडूंना त्यांचे करियर करण्यास मदत होईल आणि गोलंदाज म्हणून मी याचा उपयोग स्वत:ला आव्हान देण्याची संधी म्हणून करू शकेन. कारण टी-10 ही गोलंदाजांसाठी अनुकूल स्पर्धा नाही. म्हणून मी माझ्या कौशल्यांवर आणि आव्हानांवर काम करण्याची संधी म्हणून याकडे पाहतो.
दरम्यान, गतस्पर्धेत ब्राव्होने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे मराठा अरेबियंस संघाने विजेतेपद पटकाविले होते. यंदा तो दिल्ली बुल्स संघाकडून खेळणार आहे.