क्रिकेट कॉर्नर : इंग्लंडच्या खालावलेल्या मानसिकतेचा लाभ घ्या

– अमित डोंगरे

भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला तेव्हा पहिल्यांदा न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत पराभूत झाला. त्याचवेळी यंदाचा दौरा भारतीय संघाला अपयशाचा धनी बनवणारा ठरणार असे बोलले जात होते. इतकेच काय नॉटिंगहॅम कसोटी पावसाने वाया गेली तेव्हा तर ही टीका आणखी गडद झाली. 

मात्र, लॉर्डस कसोटीत हातातून निसटलेला सामना भारताने जिंकला व तेव्हाच इंग्लंडचा संघ मानसिकरीत्या खच्ची झाला. आता त्यांच्या याच खालावलेल्या मानसिकतेचा लाभ भारतीय संघाने या तिसऱ्या कसोटीतही घेतला पाहिजे.

नॉटिंगहॅममध्ये विजयासाठी 157 धावा हव्या असताना पावसाने सामना अनिर्णित राहिला व भारताच्या हाता तोंडाशी आलेला विजय हिरावला गेला. त्यानंतर लॉर्डस कसोटीत भारतीय फलंदाजी ढेपाळली असताना तळात महंमद शमी, जसप्रीत बुमराह यांनी अविश्‍वसनीय फलंदाजी करत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर गोलंदाजांनी आपले काम चोखपणे पार पाडताना इंग्लंडच्या फलंदाजीची वाताहत केली. हा सामना भारतीय संघाने सामन्याच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी केवळ 55 षटकांत इंग्लंडचे सगळे फलंदाज बाद करत जिंकला व मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

हा केवळ एका संघाने अन्य संघावर मिळवलेला विजय नव्हता, तर तो एक मनोवैज्ञानिक विजय होता. लॉर्डस ही जागतिक क्रिकेटची पंढरी मानली जाते व तिथे इंग्लंडचा पराभव होणे अत्यंत लाजीरवाणे समजले जाते. हे मैदान व तिथे होणारा विजय इंग्लंडसाठी विश्‍वकरंडक विजयाप्रमाणेच प्रतिष्ठेचा मानला जातो व तिथे होणारा पराभव हा पुढील कित्येक वर्षे त्यांना मान वर करू देत नाही.

इथेच भारतीय संघाने बाजी मारली व यजमान संघाला त्यांच्या सर्वांत प्रतिष्ठित मैदानावर पराभूत करत मानसिकरीत्या खच्ची केले. हा सामना हातातून जात आहे हे लक्षात आल्यावर या इंग्लंडची प्रसिद्ध कोती मानसिकता पुन्हा एकदा उफाळून आली व त्यांनी भारतीय क्रिकेटपटूंवर स्लेजिंग केले. त्यांच्या प्रेक्षकांनीही भारतीय क्रिकेटपटूंवर रोष व्यक्‍त करताना बॉटल क्राऊन फेकली. हीच खरेतर या सभ्य गृहस्थांच्या खेळाला लागलेली कीड आहे आणि ती इंग्लंडमध्येच फोफावली आहे.

जर हीच गोष्ट अन्य देशांतील खेळाडूंनी किंवा प्रेक्षकांनी केली तर त्यावर प्रचंड टीका झाली असती. मात्र, हीच गोष्ट इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटसह अन्य खेळाडूंनी केल्यावर सगळे मूग गिळून गप्प बसले आहेत. असो, आज इंग्लंडच्या संघाची मानसिकता खूप खालावलेली असून, त्यांच्या याच मानसिकतेचा लाभ भारतीय संघाने घेतला पाहिजे. जितकी चीडचीड त्यांची होईल तेवढाच प्रचंड लाभ भारतीय संघाला होणार. आता ही कसोटी जिंकली तर ही मालिकाही जिंकणे फारसे कठीण नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.