शहरात वाहन तोडफोडीची मालिका सुरूच
पिंपरी – पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने तलवारी कोयते नाचवत अक्षरशः धुडगूस घातला. या घटनेत चार जण जखमी झाले असून सात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना पिंपळे निलख येथील शारदानगर परिसरात रविवारी (दि. १४) रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली.
चेतन अहिरे (रा. पिंपळे निलख) समीर शेख (रा. कस्तुरबा गांधी झोपडपट्टी, औंध) आणि त्याचे बारा अनोळखी साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. राजकुमार आरसन पिल्ले (वय २५, रा. शारदा कॉलनी, पिंपळे निलख) यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात फिर्यादी राजकुमार पिल्ले, संतोष सिद्धेश्वर चौधरी (वय २१), चेतन गणेश जवरे (वय २०) आणि अजय भरत कांबळे (वय २४) हे चार जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे मित्र हे आपल्या घरी चालले होते. त्यावेळी आरोपी चेतन अहिरे, समीर शेख व इतर बारा जण हातात कोयते व तलवारी घेऊन दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी पिल्ले यांच्या डोक्यावर व उजव्या पायावर वार केले. पिल्ले यांचे मित्र भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांना तलवारी व कोयत्याचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी आरडाओरडा करत परिसरातील सात वाहनांची तोडफोड केली.
पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सुरु झालेले वाहनांच्या तोडफोडीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. रविवारी रात्री पिंपळे निलख परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.