प्रशासनाचे पालिका शाळा मुख्याध्यापकांना आदेश
पुणे – सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत बालभारतीकडून मिळालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना त्वरित वाटप करा. शाळांमध्ये फक्त पालकांना बोलावून पुस्तके त्यांच्या ताब्यात द्यावीत, असे आदेश महापालिका शिक्षण मंडळ प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी मुख्याध्यापकांना बजाविले आहेत.
बालभारतीकडून पाच नागरी साधन केंद्राकडे पुस्तके आली आहेत. येथून ती मुख्याध्यापकांना वाटपाचे काम सुरुच आहे. यूडायस प्रणालीत इयत्तानिहाय पटसंख्येवर नोंदविलेल्या मागणीनुसार बालभारतीकडून पुस्तके प्राप्त होत आहेत. पालिका व खासगी अनुदानित शाळांना ती वाटप करण्याची प्रक्रिया गेल्या आठवड्यापासून सुरू करण्यात आलेली आहेत.
कोणत्याही परिस्थितीत शाळांना जादाची पुस्तके मिळणार नाहीत. सामाजिक अंतराच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. पालकांकडून ओळखपत्र घ्यावे, अशा सूचना राऊत यांनी दिल्या आहेत.