स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्टचे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सवर कारवाई
14 जणांवर गुन्हे दाखल
तळेगाव दाभाडे – लॉकडाऊन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्याचे उल्लंघन करून घेण्यात आलेल्या इयत्ता अकरावी कॉमर्सच्या पुनर्परीक्षेवर प्रशासनाने अचानक छापा टाकून कारवाई केली.
मावळ तथा मुळशीचे उपविभागीय अधिकारी व आपत्ती निवारण अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्नेहवर्धक संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि संबंधित पर्यवेक्षक व परीक्षक अशा एकूण चौदा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. अध्यक्ष चंद्रकांत शेटे, सचिव किशोर राजस, संचालक गनिमिया सिकिलकर, शिवाजी आगळे, संचालक सुनील कडोलकर, सुरेश चौधरी, सुभाष खळदे, अशोक काळोखे, संजय काळोखे, मुख्याध्यापिका हेलन अँथोनी, पर्यवेक्षक दीपक खटावकर, पर्यवेक्षण करणारे संजय काजाळे, वैभवी अवचट, सपना धोत्रे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
तळेगाव दाभाडे येथील पंचवटी कॉलनीतील स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्टचे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स कॉलेजने लॉकडाऊन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्याची पायमल्ली करून इयत्ता अकरावी कॉमर्सची पुनर्परीक्षा घेतली होती. ही परीक्षा सुरू असतानाच प्रशासनाने अचानक छापा टाकून कारवाई केली. शुक्रवार (दि. 12) रोजी सकाळी 9 ते 12 या दरम्यान इयत्ता 11वी कॉमर्स आयटी विषयाची परीक्षा घेण्याकरिता शाळेच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर परीक्षेचे वेळापत्रक टाकण्यात आले होते.
त्यानुसार 27 विद्यार्थ्यांना बालविकास शाळेत बोलावून त्यांची परीक्षा घेण्यात आली. हा प्रकार आढळून आल्याने स्नेहवर्धक शैक्षणिक ट्रस्टच्या संचालक मंडळ तसेच सदर शाळेच्या मुख्याध्यापिका व प्रत्यक्ष परीक्षा घेणारा पर्यवेक्षक वर्ग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना केलेल्या आवाहनानंतरही सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी करणाऱ्या शैक्षणिक संस्थेवरील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.
मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी एम. एस. गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती निवारण अधिकारी संदेश शिर्के यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि संबंधित पर्यवेक्षक व परीक्षक अशा एकूण चौदा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, हे प्रकरण मिटविण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवर कडक कारवाईची सक्त ताकीद दिली. त्यानंतर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त डॉ. संदीप बिष्णोई यांनी वैयक्तिक लक्ष दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले.