मुंबई – रेपो दरात कपात केल्यानंतर व्यावसायिक बॅंकांनी लवकर व्याजदर कपात करावी, अशी सूचना रिझर्व्ह बॅंकेने केलेली आहे. त्यानुसार विविध बॅंका कर्जावरील आणि ठेवींवरील व्याजदरात कपात करू लागल्या आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील बडोदा बॅंक आणि युनियन बॅंकेने त्याचबरोबर खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेने व्याजदरात कपात जाहीर केली आहे. बडोदा बॅंकेने आपल्या एमसीएलआर दरामध्ये 0.15 टक्क्यांची कपात केली असून त्याची अंमलबजावणी 12 जूनपासून होणार आहे. युनियन बॅंकेने आपल्या एमसीएलआर दरात 0.10 टक्क्यांची कपात केली असून त्याची अंमलबजावणी 11 जूनपासून सुरू झाली आहे.
एचडीएफसी बॅंकेने एमसीएलआर दरामध्ये 0.5 टक्क्यांची कपात केली आहे. तर महाराष्ट्र बॅंकेने एमसीएलआर दरामध्ये 0.20 टक्क्यांची कपात केली आहे. त्याची अंमलबजावणी 8 जूनपासून सुरू झालेली आहे. गेल्या आठवड्यात पंजाब नॅशनल बॅंकेने एमसीएलआर दरांमध्ये 0.15 टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. त्यामुळे ग्राहक बॅंकांकडून घेणाऱ्या वैयक्तिक, वाहन, गृहकर्जाच्या व्याजदरांमध्ये कपात होत आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्राहक सावध असल्यामुळे कर्ज काढून खर्च करण्याची शक्यता कमी आहे. त्यासाठी बॅंकांना बरीच वातावरण निर्मिती करावी लागणार आहे.