नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ केली आहे. तर दुसरीकडे राजकीय नेतेमंडळीच या लॉक डाऊनचे नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत. कर्नाटकचे आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी एका भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन लॉकडाऊनचे सगळे नियम धाब्यावर बसवले आहेत.
चित्रदुर्ग येथे वेदवती नदीचे पूजन करण्यासाठी आलेल्या आरोग्य मंत्री श्रीरामलू यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.हजारो लोक मिरवणुकीत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मिरवणुकीत सहभागी झालेल्या आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी मास्क देखील घातला नव्हता.
या मिरवणुकीत हजारो लोकांनी भाजपचे झेंडे हातात घेऊन गर्दी केली होती. यावेळी भलामोठा सफरचंदाचा हार त्यांना घालण्यात आला.
मिरवणुकीत कोठेही सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात अली नव्हती उलट सर्वत्र पुष्पवृष्टी करण्यात येत होती. मिरवणुकीच्या मार्गावर फटाकेही फोडण्यात आले. अनेक जण श्रीरामलू यांच्या जवळ जावून पुष्पहार देखील घालत होते. नदीचे पूजन करण्यासाठी गेलेल्या श्रीरामलू हे भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन लॉक डाऊनचे तीनतेरा वाजवल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे.
हजारो लोकांच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याबद्दल श्रीरामलू यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मिरवणुकीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर देखील श्रीरामलू टीकेचे धनी बनले आहेत. या मिरवणुकीमुळे सार्वजनिक आरोग्य तर धोक्यात आलेच शिवाय वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.