नवी दिल्ली – भारतीय संघाची माजी कर्णधार व अव्वल हॉकीपटू राणी रामपाल हिची देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वात मानाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय हॉकी महासंघाने दिली आहे.
हॉकीला गतवैभव परत मिळवून देणार असल्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या राणीने या पुरस्कारासाठी आपल्या नावाची शिफारस केल्याबद्दल महासंघाचे आभार मानले आहेत. गेल्या दोन मोसमांपासून भारताच्या महिला हॉकी संघाने नेत्रदीपक वाटचाल केली आहे. जपानमध्ये होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून देण्याचा विश्वासही राणीने व्यक्त केला आहे.