बर्लिन – जेडन सेंचोने नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर बोरसिया डर्टमंड संघाने बुंदेसलीगा फुटबॉल स्पर्धेत पेडेरबर्न संघाचा सहज पराभव केला. या स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात सेंचोने आपली पहिलीच हॅट्ट्रिक साकार केली. या कामगिरीमुळे डर्टमंडने पेडेरबर्न संघाचा 6-1 असा दणदणीत पराभव केला.
स्पर्धेच्या गुणतालिकेत त्यांनी दुसरे स्थान मिळवले असून आता त्यांच्यासाठी पुढील दोन साखळी सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. या गुणतालिकेत बायर्न म्युनीचने 67 गुणांसह अव्वल स्थान राखले आसून त्यांना सलग आठव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याची संधी आहे. अर्थात डर्टमंडने 60 गुणांसह दुसरे स्थान काबीज केले असून साखळीतील उर्वरित लढती जिंकल्या तर त्यांनाही विजेतेपद मिळू शकते.
सोमवारी झालेल्या सामन्यात डर्टमंडला बायर्नकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मंगळवारी मात्र त्यांनी दर्जाला साजेसा खेळ केला व स्पर्धेत आगेकूच केली. सेंचोला यंदाच्या मोसमात फारसे यश मिळाले नव्हते. मात्र, या सामन्यात त्याने सर्व कसर भरून काढली. इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणारा 20 वर्षांचा सेंचो सध्याच्या फुटबॉल क्षेत्रातील सर्वात आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो.