सुरक्षा रक्षकांच्या कारवाईला मोठे यश
श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत जैश ए मोहंम्मदचे 3 दहशतवादी ठार झाले. त्यामध्ये जैशचा “आयईडी’तज्ञ अब्दुल रेहमान उर्फ फौजी भाई या म्होरक्याचाही समावेश आहे. अब्दुल रेहमान हा “आयईडी’ बॉम्ब तयार करण्यातला तज्ञ होता. त्यामुळे त्याचा खात्मा होणे हे सुरक्षा रक्षकांसाठी मोठे यश आहे, असे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पत्रकारांना सांगितले.
या परिसरात दहशतावादी असल्याचे समजल्यावर सुरक्षा रक्षकांनी नाकाबंदी करून शोधमोहिमेला सुरुवात केली होती. दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले गेले. मात्र त्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देताना केलेल्या गोळीबारात तिघेही दहशतवादी मारले गेले, चकमकीत ठार झालेल्या त्याच्याबरोबरच्या अन्य दोघा दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
या दोघांच्या संभाव्य पालकांना ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आले आहे. जर या पालकांनी या दोघांना ओळखले तर बारामुल्लामध्ये होणाऱ्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी त्यांना दिली जाईल. जर या पालकांनी या दोघांना ओळखले नाही, तर या दहशतवाद्यांच्या ओळखीसाठी डीएनएचे नमुने जमा करून घेतले जातील, असेही कुमार यांनी सांगितले.
पुलवामामध्ये 28 मे रोजी सुरक्षा रक्षकांनी “आयईडी’ने भरलेली एक कार पकडली होती. त्यावेळी अब्दुल रेहमान तेथून सटकण्यात यशस्वी झाला होता. त्याला लवकरच पकडले जाईल, असे त्याचवेळी सुरक्षा दलांनी म्हटले होते. त्यानुसार त्याला आज संपवले गेले आहे, असे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले.
जैश ए मोहंम्मदकडे वालिद भाई आणि लंबू भाई नावाचे आणखीन दोघे “आयईडी’तज्ञ आहेत. त्यांनाही गाठण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षक करत आहेत, असेही कुमार यांनी सांगितले.
अब्दुल रेहमानचे खऱे नाव इक्रम असे होते आणि तो जैशचा कमांडर आणि 1999 मधील विमान अपहरणातील वॉन्टेड अब्दुल रौफ असगरचा निकटचा सहकारी होता. रौफ हा जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा धाकटा भाऊ आहे. विमान अपहरणानंतरच्या वाटाघाटीत मसूदची सुटका करण्यात आली होती. अब्दुल रेहमान हा जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा पुतण्या असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याबाबत खात्री दिली जाऊ शकत नाही. अब्दुल रेहमानने काही भाडोत्री दहशतवाद्यांना बरोबर घेऊन जैश ए मोहंम्मदमध्ये पुन्हा नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याने दक्षिण काश्मीरमधील त्राल, राजपोरा आणि ख्रीव भागात तळही सुरू केले होते.
पुलवामामधील चेवा कलान आणि राजपोरा भागातही त्याच्या हालचाली होत्या. याशिवाय बडगाममधील रुमशी नाला आणि चांदूरा भागात त्याचे फोटो पसरवले गेले होते. एके-47 रायफलवर युबीजीएल (अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर) बसवण्यात तो वाकबगार होता. अब्दुल रेहमान 2017 पासून दक्षिण काश्मीरमध्ये सक्रिय होता आणि भूतकाळात अफगाणिस्तानात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली झालेल्या युद्धात तो संयुक्त फौजांविरोधात लढलाही होता. 2019 मध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या कार बॉम्ब हल्ल्यामध्येही तो सहभागी होता.