डोर्लेवाडी -करोनाने थैमान घातले असून संपूर्ण जगात लसीचा शोध सुरू आहे. तर दुसरीकडे बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावात पूत्रप्राप्तीसाठी जादूटोणा करीत अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे. झारगडवाडी गावातील स्मशानभूमीवजवळ मोठ्या स्वरूपाचा उतारा ठेऊन अज्ञात व्यक्तीने पूत्रप्राप्तीसाठी हा अघोरी प्रकार केला असावा, असा अंदाज अंनिसचे बारामती कार्याध्यक्ष विपुल पाटील, सदस्य ऋतुराज काळकुटे यांनी व्यक्त केला आहे. तसेच याबाबत अंनिसच्या बारामती शाखेकडून तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे विपुल पाटील यांनी सांगितले आहे.
उताऱ्यात-घोड्याचे चार नाल, चार कोंबडे, चार मासे, चार कवळे, चार टोप्या, लांब केस, चार लिंब, चार नारळ, चार काळे पीस, वेगवेगळी प्रकारची फळे, लहान आरसे, अशा अनेक प्रकारच्या साहित्याचा या उताऱ्यात समावेश होता. विशेष म्हणजे असा प्रकार पाहून नागरिक भीतीपोटी अन्नपाणी देखील सोडून देतात, अशा लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते व झारगडवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र टिंगरे यांनी उताऱ्यातील जिवंत असलेल्या कोंबड्याच्या मटणाचा आस्वाद घेत भोंदूबाबा करीत असलेल्या जादूटोण्याची लोकांच्या मनामध्ये असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला केली आहे.