तमिळनाडू पोलिसांची कारवाई : चालकाला ताब्यात घेत बस जप्त
पुणे – पुणे पोलिसांकडून परराज्यात प्रवासासाठी दिला जाणारा परवाना न घेता 30 प्रवाशांना घेऊन तमिळनाडूत गेलेल्या खासगी बसचालकाला तमिळनाडू पोलिसांनी ताब्यात घेतले. तेथील पोलिसांनी बस ताब्यात घेऊन प्रवाशांवरही कारवाई केली.
परराज्यात तसेच पुणे जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांत जाणाऱ्या पुणे पोलिसांच्या सेवा कार्यप्रणाली विभागाकडून परवाने दिले जात आहेत. पुणे शहरातून तमिळनाडूत जाण्यासाठी बसचालकाने 22 ते 26 मेदरम्यान प्रवासास परवानगी मिळावी म्हणून सेवा कार्यप्रणाली विभागाकडे अर्ज दिला होता. त्याने दिलेला अर्ज मंजूर होण्यापूर्वीच तो प्रवाशांना घेऊन 19 मे रोजी तमिळनाडूत गेला. तामिळनाडूतील पन्नमपुलम भागात पोलिसांनी बसचालकाकडे प्रवासी परवान्याबाबत चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडे परवाना नसल्याचे उघड झाले.
पन्नमपुलम पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी बस जप्त केली असून चालकाविरोधात कारवाई केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिली. तर, दुसऱ्या एका घटनेत पुण्याहून गडचिरोली येथे जाणाऱ्या प्रवाशांना पोलिसांनी परवाना दिला होता. या प्रवाशांनी परवान्याच्या दिनांकात फेरफार केला तसेच ज्या दिवशी प्रवास करण्याची मुभा दिली होती. त्यादिवशी गडचिरोलीला गेले नाही. उलट परवान्याच्या दिनांकात फेरफार करून प्रवास केल्याचे गडचिरोली पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाले. गडचिरोली पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सेवा कार्यप्रणाली विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी दिली.
प्रवासी परवान्यासाठी चुकीचे आधार क्रमांक
प्रवासी परवाना मिळवताना काहींनी चुकीचे आधार क्रमांक देऊन परवाने मिळवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. प्रवासी परवान्याचा अर्ज भरताना चुकीची माहिती देऊ नये. काही नागरिक बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे तसेच बसप्रवासाबाबतची माहिती देत आहे. तेथील नागरिकांना रेल्वे आणि बससेवा उपलब्ध झाल्यानंतर परवाना दिला जाणार आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना प्रवासी परवाने दिले जात आहे. संसर्गाची लक्षणे नसल्याबाबतची वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे. खात्री करून परवान्याचे वितरण केले जात आहे, असे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी सांगितले.