पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आले होते
शासनाकडून परवानगी; विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी
पुणे – पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या 16 विद्यार्थ्यांना नगर येथे आपल्या गावी जाण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार स्वारगेट आगारातून विशेष गाडी गुरुवारी दुपारी रवाना झाली.
लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक, विद्यार्थी शहरात अडकून पडले आहेत. हॉटेल्स, खानावळी बंद असल्यामुळे त्यांचे जेवणाचे हाल होत होते. पुणे शहरात स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांकडून सातत्याने गावी जाण्याची मागणी होत होती. शासनाने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता आणली असून परराज्यातील विद्यार्थी, नागरिकांना काही अटींवर परतण्याची मुभा दिली आहे.
गेल्या आठवड्यातदेखील राजस्थानमध्ये अडकलेल्या 74 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारने धुळे येथून गाड्या पाठवून पुन्हा महाराष्ट्रात आणले होते. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात अडकलेल्या नगर येथील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या 16 विद्यार्थ्यांना नगरला जाण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली. त्याकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्वारगेट आगारातून बस उपलब्ध करून दिली होती. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एसटी बस विद्यार्थ्यांना घेवून नगरच्या दिशेने रवाना झाली. यावेळी स्वारगेट स्थानक येथे विभाग नियंत्रक यामिनी जोशी, आगार व्यवस्थापक सचिन शिंदे, स्थानक प्रमुख अशोक आघाव आदी उपस्थित होते.
एसटी बसची साफसफाई
या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. घरी गेल्यावर त्यांना होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून जेवणाचे डबे आणि पाण्याची बॉटल देण्यात आली. तत्पूर्वी, एसटी महामंडळाकडून एसटी बसची साफसफाई करण्यात आली होती. शिवाय, विद्यार्थ्यांनीदेखील मास्क वापरत सुरक्षित अंतर पाळले होते, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.