टाकळी ढोकेश्वर -पारनेर तालुक्यातील ढवळपुरी परिसरातील खारवाडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त केली. तसेच कच्च्या रसायनासह तयार गावठी दारू व इतर साहित्य असा एक लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज सकाळी सात वाजेच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ढवळपुरी हद्दीत खारवाडी शिवारात ओढ्याच्या कडेला गावठी दारूभट्टी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. या पथकाने आज सकाळी सात वाजता या दारूभट्टीवर छापा टाकून ती उद्ध्वस्त केली. यावेळी दोन हजार लिटर कच्चे रसायन, 200 लिटर जळके रसायन, 70 लिटर तयार दारू, असा एकूण एक लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल व दारू तयार करण्याचे साहित्या जप्त केले.
यावेळी महेंद्र भाऊसाहेब गव्हाणे (रा. खारवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर) व सोपान हरिभाऊ पवार (रा. साकत, ता. नगर) यांना अटक करण्यात आली. सदर मुद्देमाल पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल एस. के. कदम व एस. डी. कदम यांनी पंचासमक्ष मुद्देमालाचा काही नमुना ताब्यात घेऊन उर्वरित मुद्देमाल नष्ट केला. पथकात पो. हे. कॉ. दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, सुनील चव्हाण, पो. ना. संदीप पवार, पो. कॉ. विनोद मासाळकर, चालक पो. हे. कॉ. बाळासाहेब भोपळे यांचा सामावेश होता.