पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू करण्यासाठी महगापालिकेच्या वतीने आखणी करण्यात आली आहे. त्यादृष्टीने मिठाई, बेकरी, हार्डवेअर, इलेक्ट्रिक, चष्मा, लहान मुलांचे कपड्याचे, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइलची दुकाने व गॅरेज चालू करण्यासाठी प्रभाग स्तरावर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी प्राप्त करुन घेता येणार आहे.
त्यासाठी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. संबंधित व्यवसायिकांनी तो वेबसाईट द्वारे मिळवावा व संबंधित क्षेत्रिय कार्यालयात त्याची पुढील पुर्तता करावी. असे आवाहन शहाराच्या महापौर माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रामधील नागरी वसाहतीमधील अत्यावश्यक वस्तू व्यतिरिक्तची एकल दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रभाग स्तरावर प्रभाग अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या क्षेत्रातील सर्व व्यापारी संकुले, मॉल, मार्केट या संचारबंदीच्या कालावधीत बंद राहतील. एकाच गल्लीत एकाच प्रकारच्या दुकानाकरीता अनेक अर्ज आल्यास त्यांना रोटेशन पद्धतीने परवानगी द्यावी, असे निर्देश या समितीस देण्यात आले आहेत. एक रस्ता किंवा गल्लीमध्ये अत्यावश्यक वस्तू व्यतिरिक्तच्या जास्तीत जास्त पाच दुकानांना परवानगी देण्यात येणार आहे.
पानटपरी किंवा चहाची टपरी यांना परवानगी देण्यात येणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचे व दिलेल्या नियमांचे पालन दुकानदार यांचेकडून न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दुकाने सुरु करताना काय करावे व काय करु नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना मनपाच्या संकेतस्थळावर अर्जासोबत उपलब्ध आहेत.
क्षेत्रीय कार्यालयानुसार आयडी
पिंपरी चिंचवड मनपाचे अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह क्षेत्रिय कार्यालयांचे अनुक्रमे azone@pcmcindia.gov.in, bzone@pcmcindia.gov.in, czone@pcmcindia.gov.in, dzone@pcmcindia.gov.in, ezone@pcmcindia.gov.in, fzone@pcmcindia.gov.in, gzone@pcmcindia.gov.in, hzone@pcmcindia.gov.in,
हे ईमेल आयडी आहेत.