कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आकुर्डी येथे आणखी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे करोनाने ग्रामीण भागात शिरकाव केल्याचे दिसुन येत आहे. संबधित व्यक्ती 54 वर्षांची असून ती मुंबईत चालक म्हणून काम करते. सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावातील गरोदर महिलेला ते घेऊन आले होते.
महिलेला सोडून ते आपल्या मूळ गावी परतले होते. कडगाव येथे त्यांना 16 एप्रिलला क्वॉरंनटाईन केले होते. 14 दिवस पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्या घशात दुखु लागल्याने त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. रात्री उशीरा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आल्याने त्यांना रात्री दीड वाजता सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात कोण-कोण आले याचा शोध घेण्याचे काम प्रशासन करत आहे. दरम्यान कोल्हापुरातील करोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 11वर पोहचली असून तिघे जण उपचारानंतर बरे झाले आहेत.