सोशल चॅटवर रोहित शर्माने प्रश्न टोलवला
मुंबई – भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा याने सोशल मीडियावर चॅट करत असताना चाहत्यांच्या प्रश्नांवर चांगलीच टोलेबाजी केली. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा संघात पुनरागमन करेल का या प्रश्नावर थेट धोनीलाच भेटा व त्याला हा प्रश्न विचारा असे उत्तर देत चाहत्याच्या प्रश्नातील हवाच काढून घेतली.
हरभजनसिंगही या चॅटमध्ये सहभागी होता. धोनीचा प्लॅन काय असेल, तो संघात पुनरागमन करेल का निवृत्ती जाहीर करेल असा प्रश्न एका चाहत्याने विचारल्यावर रोहितने उपरोधीकपणे उत्तर दिले. धोनी जेव्हा क्रिकेट खेळत नसतो तेव्हा त्याच्याशी संपर्क साधणे अशक्य होते. त्यामुळे मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा प्रत्यक्ष धोनीचीच भेट घ्या व त्यालाच त्याचा निर्णय विचारा, असे रोहित म्हणाला.
धोनी भारतीय संघात पुनरागमन करण्यास उत्सूक नाही त्याला केवळ आणखी दोन वर्षे आयपीएलच खेळायची आहे. तुला काय वाटते त्याच्या पुनरागमनाबाबत असे रोहितला विचारल्यावर त्याने हरभजनच्या प्रश्नावरही टोलेबाजी केली.
सध्या धोनीच्या मनात काय चालले आहे त्याचा मलाच नव्हे तर कोणालाच अंदाज लावता येत नाही. त्याने स्वतः काहीतरी ठरविलेले असेल. त्याच्याशी निवड समिती व मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधारानी चर्चा केली असेल. मात्र, तो काय निर्णय घेणार हे माहीत करुन घेण्यासाठी जे प्रश्न विचारत आहेत त्यांनी धोनीचीच भेट घ्यावी व आपल्या शंकांचे निरसन करावे, असेही रोहितने स्पष्ट केले.