‘वायसीएम’ रूग्णालयातील डॉक्टरांशी “दै. प्रभात’ने साधला संवाद
पिंपरी – करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आम्हा डॉक्टरांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. तीन शिफ्टमध्ये आम्ही काम करीत आहोत. करोनाच्या रुग्णांवर उपचार करताना आम्ही पुरेशी दक्षता आणि काळजी घेत आहोत. रुग्णांची काळजी घेतानाच त्यांच्यामुळे आपल्याला संसर्ग होणार नाही, याबाबतही जागरूक राहावे लागते, अशी माहिती महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत (वायसीएम) करोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी “दै. प्रभात’शी बोलताना दिली.
शहरातील करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वायसीएम रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. वायसीएममधील अन्य आजाराचे रुग्ण डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयात हलविण्यात आले आहेत. त्याबाबत संबंधित रुग्णालयाशी महापालिका प्रशासनाने सामंजस्य करार केलेला आहे. वायसीएम रुग्णालयात करोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी “दै. प्रभात’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. तसेच, त्यांची सध्या सुरू असलेली धावपळ टिपण्याचा प्रयत्न केला.
वायसीएम रुग्णालयातील डॉ. कोमल बिजामिया म्हणाल्या, “रुग्णालयाच्या सातव्या मजल्यावर आम्ही 40 ते 50 डॉक्टर राहत आहोत. वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या करोनाबाधित रुग्णांची आयसोलेशन वॉर्डमध्ये आम्ही पुरेशी काळजी घेत आहोत. रुग्णांना 2 वेळा जेवण दिले जाते. तसेच, डॉक्टर तीन पाळ्यांमध्ये येथे उपचारासाठी हजर असतात. त्यामुळे कोणा एकावर कामाचा अतिरिक्त ताण येत नाही. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून आम्हाला पीपीई कीट, सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज, मास्क आदींची उपलब्धता रुग्णालय प्रशासनाने करून दिलेली आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांवर उपचार करताना भीती वाटत नाही.’
“पाचव्या मजल्यावरील करोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी मी कार्यरत असल्याचे डॉ. शिवसागर जाधव यांनी नमूद केले. ते म्हणाले, “रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांचे पथक तयार करून विविध कामांचे वाटप केले आहे. 14 मार्चपासून करोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी माझ्याकडे सुरवातीला भोसरी रुग्णालयात जबाबदारी दिली होती. त्यानंतर वायसीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तर, सध्या आसलोशन वॉर्डमध्ये मी कार्यरत आहे. निवासी डॉक्टरांसाठी देखील येथे चांगली सोय आहे. 2 वेळचे जेवण, नाश्ता आदी सुविधा देण्यात आली आहे.’
डॉ. अभिजित बायले म्हणाले, “करोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना सुरवातीला भीती वाटली होती. मात्र, संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारची दक्षता घेत असल्याने आता ही भीती कमी झाली आहे. चौथ्या मजल्यावर बालरोग विभागात खोकला, सर्दी, ताप आदी लक्षणे असलेल्या मुलांची तपासणी केली जाते. त्याच मजल्यावर स्वॅब चाचणीमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास दुसऱ्या एका वॉर्डामध्ये संबंधित रुग्णांची व्यवस्था केली जाते. त्यांच्या विविध तपासण्या, औषधोपचार यांची जबाबदारी आम्ही काळजीपूर्वक पार पाडत आहोत.’