जामखेड -मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना आजपासून सुरू होत आहे. शहरात करोनाबाधित रुग्णांमुळे हॉटस्पॉट लागू आहे. या कालावधीत मुस्लिम नमाज पठण करण्यास एकत्रित आल्यास करोना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी मुस्लिम बांधवांच्या बैठकीत केले.
तहसील कार्यालयात रमजान सणानिमित्ताने मुस्लिम बांधवांची आढावा बैठक अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अयोजित केली होती. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, अझहर काझी, नादीर शेख, शाखीर शेख, जावेद बारूद, कलंदर शेख, वसीम कुरेशी, शकील काझी, मुफ्ती अर्शद, नगरसेवक अर्शद शेख सोशल डिस्टन्सिंग पाळून उपस्थित होते.
यावेळी पाटील यांनी शहरात करोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील दोन कि. मी. परिसर हॉटस्पॉट जाहीर केला आहे. शासनाने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या सूचना मुस्लिम बांधवांच्या आरोग्याच्या व जीविताच्या हिताच्या आहेत.
त्यानुसार मशिदीमध्ये व घराच्या गच्चीवर नमाज पठण, तराविह तसेच इफ्तारसाठी एकत्रित येऊ नये. कोणतेही धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित करण्यास मज्जाव करण्यात आले आहेत. सर्वांनी आपापल्या घरातच नियमित नमाज पठण, तरवीह, इफ्तार व धार्मिक कार्य पार पाडावेत. अत्यावश्यक कामाशिवाय कोणी घराबाहेर पडू नये, अशा सूचना राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने केलेल्या आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी मुस्लिम बांधवांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करण्याची ग्वाही दिली. तसेच सेहरच्यावेळी याबाबत नागरिकांना अवगत करण्यासाठी ध्वनिक्षेपकावर जाहीर करावे, तसेच मुस्लिम मोहल्ल्यात अत्यावश्यक सेवा मिळत नाहीत. त्यासाठी तेथील नागरिकांना पास द्यावेत. त्यामुळे सर्व सुविधा मुस्लिम बांधवांना मिळतील, अशी मागणी केली. त्यावर याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिले.