फलटण -वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मुंबई येथील माउली फाऊंडेशन या संस्थेच्यावतीने करोना लढाई योगदानातील एक भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयातील प्रतिथयश वकील ऍड. विश्वनाथ टाळकुटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे सुपूर्द केला.
करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी माउली फाउंडेशनच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपये देण्याचे बैठकीत ठरविले होते. त्यानुसार फलटण येथे प्रांताधिकाऱ्यांकडे ऍड. विश्वनाथ टाळकुटे, पराग नडगिरे, अभिजित माळवदे, अमोल सुकाळे, ऍड. धीरज टाळकुटे यांच्या उपस्थितीत माऊली परिवाराच्यावतीने धनादेश सुपूर्द करण्यात आला.
करोनावर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय यंत्रणा युद्ध पातळीवर प्रयत्नशील असताना संशयीत व बाधित रुग्णांवर सुरु असलेले वैद्यकीय उपचार, औषध पुरवठा, गरिबांसाठी आवश्यक अन्न पुरवठा, अधिक वैद्यकीय सेवा सुविधांची तातडीने उभारणी वगैरे बाबीसाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची आवश्यकता लक्षात घेऊन माऊली फाउंडेशननेही या कामात सक्रिय सहभाग घेण्याचे यापूर्वीच निश्चित केले होते.
माउली फौंडेशन संस्थेच्या माध्यमातून आळंदी, पंढरपूर या तीर्थक्षेत्री त्याचप्रमाणे माऊली पालखी सोहळ्याच्या मार्गावर प्रतिवर्षी मोठया प्रमाणात अन्नदान करण्यात येते. पालखी सोहळ्यासमवेत डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांच्या टीमसोबत फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून वारीतील भाविकांना वैद्यकीय सेवासुविधा व औषधोपचार मोफत उपलब्ध करुन देण्यात येतात. त्याशिवाय शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यातही फाउंडेशन प्रयत्नशील असते.