पुणे – करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी ससून रुग्णालयात उभारलेल्या 11 मजली इमारतीमध्ये अवघ्या 36 तासांत नवीन उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली. महावितरणकडून नवी वीजयंत्रणा उभारण्याच्या सर्व कामांची जबाबदारी घेत या इमारतीसाठी 604 केडब्लू वीजभाराची नवीन उच्चदाब वीजजोडणी शुक्रवारी सायंकाळी 5.45 वाजता कार्यान्वित केली.
ससून रुग्णालयातील नवीन इमारतीमध्ये प्राणवायू पाइपलाइन, सक्शन कॉंम्प्रेसर, अद्ययावत व्हेंटिलेटर, मॉनिटर आदींसह अतिदक्षता विभाग उपचारासाठी सूसज्ज आहेत. या इमारतीसाठी उच्चदाब वीजजोडणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गुरुवारी (दि. 2) महावितरणकडे मागणी नोंदविली होती. वैद्यकीय सेवेची सध्याची निकड लक्षात घेऊन मुख्य अभियंता सचिन तालेवार, रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत यांनी उच्चदाब वीजजोडणी त्वरीत देण्यासाठी थेट कार्यवाहीला सुरुवात केली. जागेच्या सर्वेक्षणनुसार ससून रुग्णालयाजवळच असलेल्या उच्चदाब 22 केव्ही वीजवाहिनीवरून ही वीजजोडणी देण्याचे निश्चित केले. यासोबतच महावितरण अंतर्गत उच्चदाबाच्या नवीन वीजजोडणीची सर्व ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून त्याच दिवशी रात्री कोटेशन तयार केले.
कांचन टेली इन्फ्रा इंजिनिअर्सचे विक्रम शेंडगे यांच्या सहकार्याने शुक्रवारी सकाळी वीजयंत्रणेच्या कामाला प्रारंभ झाला. यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने उच्चदाब भूमिगत वाहिन्यांचे काम करण्यात आले. सर्वांत महत्त्वाचे आव्हानात्मक मीटरिंग क्युबिकलचे काम वेगाने करण्यात आले. तसेच अर्थिंग, नवीन मीटर, संबंधीत विविध उपकरणे बसवून त्याची चाचणी घेण्यात आली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत या नवीन उच्चदाब वीजजोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
या कामगिरीमध्ये बंडगार्डन विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सतीश कुलकर्णी (वाडिया उपविभाग), अनिल कुराडे (चाचणी विभाग), सहाय्यक अभियंता सिद्धार्थ सोनसळे तसेच अनिल चावके, सुनील सुरनार, अजय ठाकरे या कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.