नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेनी सर्व प्रवासी रेल्वेसेवा बंद केल्या आहेत. मात्र, १५ एप्रिलला लॉकडाऊन उघडण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने बुकिंगसाठी गर्दी झाली आहे. अनेक प्रमुख रेल्वेच्या बुकिंग फुल्ल असून वेटिंग लिस्टही जाहीर झाल्या आहेत. अशामध्ये ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सूट रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
देशभरात सध्या करोना व्हायरस थैमान घालत आहे. अशातच १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपत असल्याने लोकांनी अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सूट रद्द केली आहे. यामुळे अनावश्यक प्रवास होणार नाही, असे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी महिलांना ५० तर पुरुषांना ४० टक्के सूट देण्यात येत होती.
दरम्यान, केंद्र सरकारच्या हिरवा सिग्नलनंतरच रेल्वे गाडया सुरु होतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी प्रशासनाने रेल्वे गाड्यांचे नियोजन केले असून यामध्ये गाड्यांचे, त्यांची संख्याचे वेळापत्रक असणार आहे. जवळपास ८० टक्के गाड्या पूर्ववत होण्याची शक्यता आहे. यामध्ये राजधानी, शताब्दी, दुरंतो या गाड्यांचा समावेश असणार आहे.