सातारा – सातारा शहरालगतच्या त्रिशंकू भागातील निर्जंतुकीकरणाकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. ही उणीव लक्षात घेऊन गोडोली, शाहूनगर व लगतच्या सोसायट्यांमध्ये जंतुनाशक फवारणीसाठी गोडोली येथील रवी पवार व त्यांच्या मित्रमंडळींनी पुढाकार घेतला. त्यांनी त्रिशंकू भाग पिंजून काढत जंतुनाशक फवारणी केली.
या उपक्रमाचे त्रिशंकू भागातील नागरिकांनी स्वागत केले. बोगदा, पॉवर हाऊस, चार भिंती, कोल्हाटी वस्ती, शाहूनगर, जगतापवाडी, गोडोली, साईबाबा मंदिराची पिछाडी, गोडोली तळे येथील झोपडपट्टी, रामराव पवारनगर, गोळीबार मैदान या भागात 35 हजार लोकवस्ती आहे. हा भाग त्रिशंकू असल्याने अनेक सुविधांपासून वंचित आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेने चाळीस वॉर्डांमध्ये जंतुनाशक फवारणी सुरू केली आहे. मात्र, त्रिशंकू भागात फवारणी होत नसल्याने तेथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
ही बाब समजताच आ शिवेंद्रराजे भोसले यांच्या सूचनेनुसार रवी पवार व मित्रसमूहाने त्रिशंकू भागात औषध फवारणी सुरू केली आहे. राहुल पाटोळे, बंटी सुर्वे, सोहेल निकम, धनेश खुडे, विनोद यादव यांनी अश्विनी कॉलनी, सन्मित्र कॉलनी, गोडोली तळे येथील झोपडपट्टी, पायरी प्लाझा, जगदेव कॉर्नर, साई सोसायटी, विश्वकर्मा सोसायटी, पायरी पार्क, अवी सोसायटी, तिरुपती सोसायटी, सप्ततारा सोसायटी, सारंग कॉलनी, ज्योतिर्लिंग कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी, शिवप्रेमी कॉलनी, राजहंस कॉलनी, रामराव पवारनगर, अबकडइ कॉलनी, महारूद्र कॉलनी, इंगळे कॉलनी, छ. शिवाजीनगर, ठक्कर सिटी, गोळीबार मैदान या भागात पाच दिवसांमध्ये जंतुनाशक फवारणी करून रस्त्याकडेला डीडीटी पावडर टाकण्यात आली.
या पथकाने तीस टक्के भागात फवारणी केली असून शाहूनगर व जगतापवाडी येथे उद्यापासून फवारणी करण्यात येणार असल्याचे रवी पवार यांनी सांगितले. यासाठी जिल्हा परिषद सदस्य मधुताई कांबळे, पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण व विलासपूर ग्रामपंचायतीने जंतुनाशके उपलब्ध केली तर पवार आणि त्यांच्या मित्रांनी वर्गणी काढून पंधरा लीटरचा हॅंडपंप विकत घेतला. दरम्यान, त्रिशंकू भागाच्या बाबतीत पालिकेने नियमावर बोट ठेवल्याने या भागात अद्याप जंतुनाशक फवारणी झाली नसून पालिकेने तातडीने थोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.