पुणे – शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, मंगळवारी (दि. 31) आणखी चार व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये तीन पुणे शहर आणि एक जिल्ह्यातील रुग्ण आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 46 वर पोहचलेली आहे. दरम्यान, दिवसभरात केलेल्या तपासणीमध्ये 43 व्यक्तींचे नमुने प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
करोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य शासनाकडून आतोनात प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी आहे. मात्र, आजही काही बेजबाबदार नागरिकांमुळे शहरात करोनाचे रुग्ण आढळून येत आहे. प्रामुख्याने जे व्यक्ती परदेशात जाऊन आले, त्यांनी प्रशासनाला वेळीच माहिती न दिल्यामुळे मागील दोन दिवसांत रुग्णांचा आकडा वाढतच आहे. दरम्यान, जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी करोनाबाधित एक व्यक्ती आढळून आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची तपासणी केली असता, आणखी एका महिलेला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर अन्य कुटुंबीयांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.
तसेच पुणे शहरातील बाधित व्यक्तीची परदेश प्रवासाचा इतिहास असून, त्याच्या कुटुंबातील व्यक्तींसह संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत 908 व्यक्तींची करोना विषाणूची तपासणी करण्यात आली असून, 831 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर 26 व्यक्ती डॉ. नायडू रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यातील 2 व्यक्तींची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या पुणे महानगरपालिका हद्दीत 30, पुणे जिल्ह्यात 6 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 12 असे एकूण 48 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यातील 16 जणांना घरी सोडण्यात आले आहे.