अमेरिकेसाठी पुढील 30 दिवस अत्यंत महत्त्वाचे – ट्रम्प

वॉशिंग्टन  – अमेरिकेसाठी पुढील 30 दिवस अत्यंत कठीण आणि महत्त्वाचे आहेत, असे त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. आज अमेरिकेतील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 1 लाख 64 हजारांवर गेला असून मृतांचा आकडा 3100 च्या पुढे गेला आहे. ट्रम्प यांनी सामाजिक निर्बंधांची मुदत येत्या 30 एप्रिल पर्यंत वाढवली आहे. येत्या दोन आठवड्यात अमेरिकेतील मृतांचा आकडा सर्वोच्च पातळी गाठू शकतो, असा इशाराही त्यांनी आधीच दिला आहे.

आज व्हाईट हाऊस मधून पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आमच्यासाठी पुढील 30 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात मोठी आव्हानात्मक स्थिती निर्माण होऊ शकते. अमेरिकेतील एकूण 330 दशलक्ष लोकसंख्येपैकी 250 दशलक्ष नागरिक घरातच बंद अवस्थेत आहेत. करोनाग्रस्तांसाठी वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी अमेरिकेत लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. तेथे तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालये उभारण्याचे काम लष्कराला करायला सांगण्यात आले असून त्याची सध्या तेथे मोठी गरज आहे.

या तीस दिवसांसाठी आम्ही आमची सारी कसब पणाला लावली आहे असे त्यांनी सांगितले. लोकांच्या चाचणीचे प्रमाण आम्ही वाढवले आहे असे नमूद करताना त्यांनी सांगितले की, आज रोज एक लाख लोकांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. वैद्यकीय साधने आणि उपकरणांचे प्रमाण वाढवण्याची सुचना सर्व संबंधितांना करण्यात आली असून त्याची कमतरता भासणार नाही असा दिलासाही त्यांनी दिला आहे. मोटार उत्पादक कंपन्यांना मोटरींचे उत्पादन थांबवून व्हेंटिलेटर्सचे उत्पादन सुरू करण्यास सांगण्यात आले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, लोकांचे प्राण वाचवण्याला आम्ही आज सर्वाधिक प्राधान्य दिले असून अर्थव्यवस्था सुरळीत करण्याला आमचे दुसरे प्राधान्य आहे. ते आमच्या हातात आहे मी ही अर्थव्यवस्था तातडीने सुरळीत करू शकतो, असा विश्‍वासही त्यांनी दिला आहे. आज संपूर्ण जगात करोनाग्रस्तांची संख्या साडेसात लाखांच्यावर गेली असून जगभरातील मृत्यूंची संख्या 35 हजारावर गेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.