बीजिंग – चीनमध्ये करोनाचा कहर ओसरत असतानाच आणखीन एक नैसर्गिक आपत्ती उद्भवली आहे. चीनच्या दक्षिण पश्चिमेकडील सिचुयान प्रांतामध्ये मोठा वणवा भडकला असून ही आग विझवण्यासाठी गेलेल्या 18 फायर फायटर्सबरोबर एका शेतकऱ्याचाही या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. चीनमधील शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.
सोमवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास स्थानिक शेतात ही आग लागली आणि जोरदार वाऱ्याने जवळच असलेल्या डोंगरावर त्वरित पसरली. ही आग विझवण्यासाठी गेलेल्या 18 फायर फायटर बरोबर एका शेतकऱ्याचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे. वाऱ्याची दिशा अचानक बदलल्याने आगीचे लोळ विरुद्ध दिशेला आले. त्यामध्ये हे सर्व जण अडकले आणि होरपळले. या सर्वजणांच्या मदतीसाठी 300 हून अधिक अग्निशमन दलाचे प्रशिक्षित जवान आणि 700 सैनिक पाठविण्यात आले होते. या आगीमागील कारण शोधले जात आहे, असे वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान चीनच्या युनान प्रांतात रविवारी आणखीन एका ठिकाणी आग भडकली. ही आग तब्बल 90 हेक्टर परिसरामध्ये पसरली होती. या परिसरातील 1,800 नागरिकांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तैनात करावे लागले होते. 12 फायर इंजिन आणि 3 हेलिकॉप्टरही त्या कामावर धाडली गेली होती. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीमागील कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. वर्षभरापूर्वी सिचुयान प्रांतातच अशाच प्रकारे लागलेल्या आगीमध्ये 30 जण मरण पावले होते. त्यामध्ये आग विझवण्याच्या प्रयत्नात असलेल्या 27 फायर फायटरचाही समावेश होता.