बफर झोन मांजरी बुद्रुक गावाला भेट देऊन केली पाहणी
मांजरी : कोरोना विषाणू संसर्गाबाबत राज्य शासन अलर्ट झाले असून वरिष्ठ स्तरावरून जिल्हा आरोग्य यंत्रणेला वारंवार सूचना येत आहेत. या सूचनांचे पालन जिल्हा मुख्यालय ते गाव स्तरापर्यंतच्या सर्व यंत्रणांनी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ‘कोरोनो’ संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत कोणताही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बफर झोन असलेल्या मांजरी बुद्रुक गावाला शुक्रवारी ( दि.२० ) प्रसाद यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली . यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार यांनी गावातील काही प्रातिनिधिक घरांना भेटी देऊन कुटुंबातील सदस्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, डॉ. सचिन खरात,जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच शिवराज घुले, ग्रामसेवक अनिल कुंभार, सदस्य अमित घुले, आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे सर्व यंत्रणांनी काटेकोर पालन करावे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. नागरिकांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नसली तरी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासन ‘अलर्ट’वर असून प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या विभागांना जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या आहेत. या जबाबदाºया गांभीर्याने पार पाडा, असे आवाहनही आयुष प्रसाद यांनी केले आहे.
अन्यथा गुन्हे दाखल करा…
कोरोना पार्श्वभूमीवर मांजरी बुद्रुक गाव बफर झोनमध्ये आहे. दिलेल्या सूचना काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.गावातील नागरिक किंवा एखादी सोसायटी त्याला प्रतिसाद देत नसेल, कोणी वर्क फ्रॉम होम, होम क्वारंटाईन यांचे पालन करत ,नसेल तर त्यांच्यावर त्वरीत गुन्हे दाखल करण्यात यावेत ,सोसायटी सील करण्यात यावी असा सूचना आयुष प्रसाद यांनी ग्रामपंचायत सरपंच शिवराज घुले आणि प्रशासनाला केल्या आहेत.