नवी दिल्ली : लक्षणे आणि करोनाग्रस्त देशांमधील प्रवासाच्या पार्श्वभुमीमुळे करोनाची लागण झाल्याच्या संशय असलेल्या घटनांमधील “सॅम्पल स्क्रीनिंग’चा भार वाढल्यामुळे, आरोग्य संशोधन विभाग / आयसीएमआरने देशभरात “कोविड -19′ च्या चाचणीसाठी 52 प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
देशभरात करोन विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. ही संख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशभरात 6 मार्च पर्यंत 3,404 व्यक्तींकडून एकूण 4,058 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यात चीनमधील वुहानमधून बाहेर काढलेले, आयटीबीपी व मानेसर शिबिरामध्ये अलग ठेवण्यात आलेल्या 654 व्यक्तींच्या 1,308 नमुन्यांची चाचणी समाविष्ट आहे. या सर्वांची 14 दिवसात 2 वेळा चाचणी घेण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, 27 फेब्रुवारी रोजी वुहान आणि जपानमधील डायमंड प्रिन्सेस जहाजावरून बाहेर काढण्यात आलेल्या आणखी 236 जणांचीही दोनदा तपासणी करण्यात आली.
आतापर्यंत भारतात 31 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यामध्ये 16 इटालियन लोकांचा समावेश आहे, तर जवळपास 29,000 लोकांना निरीक्षणाखाली ठेवले आहे.
आंध्र प्रदेशात, तिरुपती येथील श्रीवेनकटेश्वर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स, विशाखापट्टणममधील आंध्र मेडिकल कॉलेज आणि जीएमसी, अनंतपूर येथे कार्यरत आहेत. तर आसाममध्ये, गुवाहाटीमधील गोवाहटी मेडिकल कॉलेजेस आणि दिब्रूगडमध्ये रिजनल मेडिकल रिसर्च सेंटर या तपासणीसाठी कार्यरत आहेत.
बिहारमध्ये पाटणा, चंदिगडमध्ये एम्स आणि “पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल रिसर्च’, दिल्लीमध्ये “एम्स’ आणि नॅशनल सेटर फॉर डिसीज कंट्रोलमध्ये तर गुजरातमध्ये अहमदाबादेतील बीजे मेडिकल कॉलेज आणि जामनगरमध्ये एमपी शाह सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये करोन विषाणूच्या तपसणीची सोय करण्यात आली आहे.
याशिवाय जयपूर, जोधपूर, बिकानेर, लखनौ, वाराणसी, अलिगढ, हलदवाणी, कोलकाता, जबलपूर, म्हैसूर, बंगलोर तसेच दक्षिणेकडे तिरुवनंतपुरम, शिवामोग्गामध्येही करोनाच्या तपासणीच्या प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत.
मेडिकल मास्कची साठेबाजी आणि आवाजवी किंमत आकारणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी दिला आहे.