परिस्थिती माणसाला घडवते..शिकवते..हे जरी खरं असलं, तरीही मनासारखं करण्यासाठी अवकाश मिळणंही महत्त्वाचं असतं. पाठिंब्याचं अवकाश जेव्हा मिळतं, तेव्हा खऱ्या अर्थानं यशाकडे प्रवास सुरू होतो. आकृती आर्किटेक्ट्स ऍन्ड डिझाइन्सच्या संचालिका सौ. तृप्ती हवालदार यांच्याबाबतीत नेमकं हेच म्हणता येईल. त्यांचे पती अनिल हवालदार हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यामुळंच अवघ्या पंधरा वर्षांच्या व्यवसाय प्रवासात त्यांनी मोठा पल्ला गाठला आहे.
सुरुवातीचे दिवस…
तृप्ती हवालदार या मूळच्या अकोल्याच्या. तेथील जलाराम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्यांचं बारावीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यांच्या घराला इंजिनिअर्सचं घर असं म्हटलं, तरी वावगं ठरणार नाही. त्यांचे वडीलही इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते. त्यामुळं भविष्यात इंजिनिअर किंवा फार तर डॉक्टर हे ठरूनच प्रवास सुरू होता. तृप्ती या अभ्यासातही हुशार होत्या. पण, त्या आठवीत असताना त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानं मोठं संकट कुटुंबावर कोसळलं. या एका प्रसंगानं त्यांची परिस्थिती खूपच बदलली. आईला वडिलांच्या जागेवर कारकून म्हणून नोकरी मिळाली. मोठ्या बहिणीला पुढं शिकायचं होतं; पण घरची सगळी जबाबदारी तिनं घेतली. मग, तृप्ती यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्या काकानं घेतली. वडील नसल्यामुळं आहे त्या गोष्टीत काटकसर करून पैशांचं नियोजन चांगलं कसं करता येईल, ही गोष्ट शिकता आली. नुसता अभ्यास करायचा नाही, तर काहीतरी बनून दाखवायचं हे ध्येय या परिस्थितीतूनच जन्माला आलं. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून आर्किटेक्चरमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं. कॉलेजनंतर काही काळ अकोल्यात काम केलं. पण, मला वेगळं जग खुणावत होतं. त्याच्याच शोधात मी होते, अखेर मला ती संधी मिळाली, असं तृप्तीजी सांगतात.
अनुभवांची कक्षा रुंदावली
“माझी एक मैत्रीण नोकरीसाठी पुण्याला येणार होती. मीदेखील घरच्यांचा विरोध पत्करून पुण्याला आले. त्यावेळी आजी सोडून सगळ्यांना माझा हा निर्णय पटला नव्हता. सोबत आईनं दिलेले 1,500 रुपये होते. पुण्याला एका ठिकाणी मुलाखत दिली आणि तिथंच नोकरीही मिळाली. चांगला बॉस मिळणं हे पुढं जाण्यासाठी महत्त्वाचे असते. ग्रुप आर्किटेक्ट्स ऍन्ड डिझाइनर्स कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. वरिष्ठांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. तिथले सर त्यांना नेहमी म्हणायचे, चुकीचं काही झालं तर मी सांगेन. पण, तुम्ही स्वतःहून नव्या गोष्टी करा. अशा पाठिंब्यामुळं अनेक नव्या गोष्टी आत्मसात करता आल्या,’ असं तृप्ती हवालदार सांगतात.
मुक्काम पोस्ट पुणे
पहिल्या नोकरीचा पगार होता, दोन हजार रुपये. ऑफिसमधला स्टाफ जेवायला एकत्र बसत. तेव्हा तृप्ती या त्यांचा डबा मेसमधून मागवत. ते पाहून त्यांच्या एका सहकाऱ्याला वाटलं, की तृप्ती यांनी घरचं जेवण खायला हवं. मग तो सहकारी स्वतःच डबा आणायचा आणि ते एकत्र जेवत. यातूनच दोघांचं प्रेम कधी आणि कसं जुळलं ते एकमेकांनाच कळलं नाही. दोघांनी एकमेकांना विचारण्याआधीच प्रत्येकानं घरच्यांना कल्पना दिली. मग, पुढं इंटरकास्ट मॅरेज झालं. वर्ष होतं -2004!
आकार आकृतीचा!
लग्नानंतर दोघांनी एकत्र नोकरी करायची नाही, असा निर्णय घेतला. मग अनिल हवालदार यांनी त्यांची नोकरी बदलली. त्याचवेळी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला! नवा संसार आणि नवा व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर काम करावं लागणार होतं. दिवसभर नोकरी आणि उरलेल्या वेळेत किंवा सुटीदिवशी व्यवसाय, असं काम सुरू झालं. मग तृप्ती हवालदार यांनी नोकरी करून घरातूनच आर्किटेक्टसंबंधी कामं सुरू केली. बाहेरच्या मीटिंग्ज अनिल हे आणि बाकी कामं तृप्ती हवालदार या सांभाळत. 2004 मध्ये सुरू केलेल्या व्यवसायाचं रोपटं उभं करण्यासाठी दोघंही 18-20 तास काम करत. याबद्दल तृप्ती हवालदार म्हणाल्या, “खरंतर तेव्हा चांगलं काम करणं हेच डोक्यात होतं. नंतर आम्ही छोटं ऑफिस घेतलं. व्यवसायासाठी चांगल्या लोकांचा पाठिंबा मिळाला. पंडित म्हणून सुरुवातीला एक जण भेटले. त्यांनी कॉम्प्युटर आणि टेबल-खुर्चीसाठी लोन करून दिलं. डेव्हलपर म्हणून काम करतानाही त्यांनीच पहिला प्लॉट दिला. त्यानंतर मोठं ऑफिस सुरू केलं, तेव्हा “व्यवसाय आकाराला येतो तो आपल्या ग्राहकांमुळं’ ही भावना ठेवून आमचे पहिले क्लायंट श्री. जोशी यांच्या हस्ते उद्घाटन केलं. आकृतीच्या आजवरच्या प्रवासात 500वर प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत. शिवाय आमच्याबरोबर 17-18 जण काम करतात.’
सुपरमॅन…
अनिल हवालदार यांच्या असलेल्या पाठिंब्यामुळंच मी इथपर्यंत पोहचू शकले, अशी भावना तृप्ती हवालदार नमूद करतात. व्यवसाय सुरू केल्यानंतर चेहरा म्हणून अनिल हवालदार यांनी तृप्ती हवालदार यांनाच पुढं केलं. त्यांच्यातल्या उद्योजिकेला हेरून अलीकडेच आकृती डेव्हलपर्स हा व्यवसायही सुरू केला आहे. एक स्त्री म्हणून अनिल हवालदार यांनी माझा सन्मान तर जपलाच, पण मला जबाबदारी देऊन प्रोत्साहितही केलं. त्यांचा हाच विश्वास मला नवं काही करण्याची प्रेरणा देत गेला,’ असं तृप्ती हवालदार सांगतात.
प्राधान्य कुटुंबाला…
2010 मध्ये मुलगा-वरुणचा जन्म झाला. तो काळ व्यवसाय उभारणीचाही होता. पण, घरच्या आघाडीवर तृप्ती हवालदार कुठंही कमी पडल्या नाहीत. त्यांनी वरुणला पाळणाघरात ठेवलं नाही. तो ऑफिसमध्येच मोठा होत होता. तृप्ती हवालदार काम सांभाळत वरुणकडेही लक्ष द्यायच्या. तो शाळेत जाऊ लागल्यावर त्याला नेण्या-आणण्याची जबाबदारीही दोघांनी विभागून घेतली. आता बाहेरची सगळी कामं, मीटिंग्ज, क्लायंट व्हिजिट वगैरे अनिल हवालदार सांभाळतात, तर ऑफिसमधली सर्व कामे क्रिएटिव्ह डिझाइन्स, मॅनेजमेंट हे तृप्ती हवालदार सांभाळतात. दुपारच्या जेवणावेळी एकत्र भेटतात आणि काम, प्रोजेक्ट अपडेट्सबद्दल चर्चा करतात.
नो शॉर्टकट प्लीज…
कोणतंही काम करताना त्यात शॉर्टकट नकोच ही भूमिका “आकृती’मध्ये तंतोतंत पाळली जाते. मेहनत घेण्याची, डोकं शांत ठेवून तत्परतेनं काम करण्याची तयारी असल्यामुळंच शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा आदर्श ठेवून “आकृती’ची वाटचाल सुरू आहे. “आकृती’च्या कार्यालयात गेल्यावर किर्लोस्कर यांचा हाच संदेश आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेतो.
आकृतीचं वेगळेपण…
उत्कृष्ट डिझाइन
कामातली अचूकता
आवश्यकता असल्यास 24 ु 7 सेवेत
रेसिडेन्शिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रिअल, गव्हर्नमेंट अशा सर्व प्रकारच्या कामांचा अनुभव
स्टार्ट टु एन्ड लीगल सोल्युशन