सातारा जिल्हा परिषदेचा प्रथमच अभिनव उपक्रम; तीन विजेत्या महिलांचा झाला गौरव
सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी महिलांसाठी सोमवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात पाककलेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेने पहिल्यांदाच राबवलेल्या या उपक्रमात प्रथम तीन महिलांना बक्षीस देवून गौरवण्यात आले.
जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व खासगी अनुदानित शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी महिलांसाठी शालेय पोषण आहारच्या लेखाधिकारी माधवी आव्हाड यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा झाली. महिला एकत्र याव्यात, विचारांची देवाणघेवाण व्हावी, नवनवीन करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, समस्यांचे निराकरण व्हावे, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी काय उपयुक्त आहे, काय नाही याची माहिती व्हावी, हे स्पर्धेचे उद्देश होते. स्वयंपाकी महिलांनी विविध प्रकारचे पदार्थ बनवले होते. तालुकास्तरावर प्रथम तीन क्रमांक आलेल्या स्वयंपाकी महिलांची या स्पर्धेसाठी निवड झाली होती.
शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धर्मेंद्र काळोखे, माधवी आव्हाड उपस्थित होते. प्रोत्साहनासाठी ही स्पर्धा उपयुक्त असल्याचे मानसिंगराव जगदाळे यांनी सांगितले. दुपारच्या सत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी पाककला प्रदर्शनास भेट देवून विविध पदार्थांची चव चाखली. शालेय पोषण आहाराबाबत त्यांनी स्वयंपाकी महिलांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.